लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा, उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

अहमदनगर,दि.६ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – आपल्या दैवी आवाजाने तब्बल चार पिढ्यांवर जादू निर्माण करणाऱ्या गायिका लता मंगेशकर यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यामुळे राज्य सरकारने दुखवटा जाहीर केला आहे. त्यानिमित्ताने उद्या सोमवार ७ फेब्रुवारी रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारनेही राजकीय दुखवटा जाहीर केल्याने दोन दिवस सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. तसेच मंत्रालयावरील तिरंगा झेंडा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे. तसेच संसदेसह देशभरातील विधानसभा, मंत्रालये, सचिवालये आणि सरकारी कार्यालयांवरील तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात आला आहे.

भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, “आज (रविवार, ६ फेब्रुवारी) भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.”

तर, “लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. आमच्यावरचा मातृतुल्य आशीर्वाद हरपला.” अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावेत अशा सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here