नगर शहराच्या खेळाडूने रचला विक्रमी त्रिशतकाचा इतिहास

१४ वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रणय सीसवालचे विक्रमी धावांचे त्रिशतक

अहमदनगर,दि.८ जानेवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने सुरु असलेल्या १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रियदर्शनी क्रिकेट अकॅडमीने ४० षटकात सर्वोच्च ४३७ धावसंख्या उभारली. तर या संघातील फलंदाज  प्रणय सीसवाल या खेळाडूने त्रिशतक नोंदवून विक्रमी धावांचा इतिहास रचला. वाकोडी फाटा येथील मैदानात टर्फ विकेटवर सुरु असलेल्या एस.के. क्रिकेट अ‍ॅकॅडमी आयोजित विठ्ठल (बापू) आडोळे स्मृती करंडक १४ वर्षाखालील जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत सातवा सामना प्रियदर्शनी क्रिकेट अ‍ॅकॅडमी विरुद्ध एस.के. क्रिकेट अकॅडमी (ब) यांच्यात झाला.

एस.के. क्रिकेट अ‍ॅकॅडमीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्विकारली. प्रियदर्शनी क्रिकेट अकॅडमीने या स्पर्धेत ४० षटकात सर्वोच्च ४३७ धावसंख्या उभारली. यामध्ये प्रियदर्शनीचा फलंदाज प्रणय सीसवाल याने तुफान फटकेबाजी करीत वैयक्तिक १४० चेंडूमध्ये ५३ चौकार व ५ षटकारच्या मदतीने ३१२ नाबाद धावा केल्या.
नाबाद त्रिशतक करणार्‍या प्रणय सीसवाल या खेळाडूचा अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सहसचिव प्रा. माणिक विधाते यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तर विजयी संघाच्या कर्णधाराचा सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप घोडके, संदीप आडोळे, गणेश बोरूडे, हनुमंत दळवी, सार्थक खिस्ती आदी उपस्थित होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शहर व गाव पातळीवरुन क्रिकेटचे उत्कृष्ट खेळाडू पुढे येत आहे. जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करुन महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी आपल्या खेळाचा दबदबा कायम राखला आहे. अशा खेळाडूंना अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नेहमीच प्रोत्साहन व पाठबळ देण्यात येत असून, जिल्ह्यातील गुणवंत खेळाडूंना भारतीय संघात पाठविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. त्रिशतक झळकाविणार्‍या खेळाडू सीसवाल याचे जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी अभिनंदन केले.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here