नगर जिल्ह्यातील मातब्बर गडाख-घुले कुटुंबात वाजले सोयरीकीचे मंगलसुर

अहमदनगर,दि.१६ नोव्हेंबर,(प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील नेवासा व शेवगाव तालुक्यात वर्षांनुवर्षांपासून असलेले गडाख व घुले या दोन बड्या राजकीय घराण्यांचे वैर सर्वांना परिचित आहे. परंतु आता तिसर्‍या पिढीत हे वैर कायमस्वरुपी संपण्याची चिन्हे आहेत. शिवसेनेचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन व राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांची सोयरिक ठरली आहे. या विवाहामुळे गडाख-घुले परिवारात पसरलेला आनंदोत्सव भविष्यात या दोन्ही तालुक्यांतीलच नव्हे तर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींवर परिणाम करणारा ठरणार आहे.

नेवाशाचे आमदार व राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव तथा युवा नेते उदयन गडाख व शेवगावचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता घुले यांची सोयरिक ठरली आहे. डॉ. निवेदिता या पुण्यातील भारती विद्यापीठात रेडिओ डायग्नोसिसमध्ये एमडीच्या दुसर्‍या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. तर उदयन गडाख यांनी अहमदनगर येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून ते राजकारणात सक्रिय झाले आहेत.

नेवासे-शेवगाव परिसरात गडाख व घुले या परिवारातील राजकीय संघर्ष जवळपास बहुतांश सामायिक ऊस कार्यक्षेत्र असलेल्या अनुक्रमे मुळा साखर कारखाना व ज्ञानेश्‍वर साखर कारखाना यांच्या निवडणुकींतून नेहमी दिसला आहे. अर्थात हा संघर्ष तेवढ्यापुरताच राहिला नाही तर ग्रामपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदा व नगर पंचायतींसह पुढे विधानसभा व लोकसभा निवडणुकांतून झिरपत राहिला व कमी-अधिक प्रमाणात एकमेकांना शह देत राहिला. आधीच्या पिढीतील यशवंतराव गडाख व मारुतराव घुले यांच्यातील संघर्ष पुढे नरेंद्र घुले-चंद्रशेखर घुले आणि शंकरराव गडाख-प्रशांत गडाख यांच्या काळातही सुरू होता. विविध छोट्या-मोेठ्या निवडणुकांतून एकमेकांना शह-काटशह सुरू होता.

दोन वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीत नेवाशात शंकरराव गडाख क्रांतीकारी शेतकरी पक्षाकडून उमेदवारी करीत असताना घुले परिवाराने त्यांच्याशी दिलजमाई करीत त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार दिला नाही व जवळपास अपक्ष उभे असलेल्या गडाखांना पाठबळ देऊन निवडून आणले. तेव्हापासून या दोन्ही परिवारात दरवळू लागलेले सलोख्याचे सूर आता सनईच्या सूरात रुपांतरीत होताना मुलांच्या लग्नगाठीच्या रुपाने कायमस्वरुपी बंधनात अडकणार आहेत व नेवासे-शेवगाव परिसरातील मागील कित्येक वर्षांपासूनचे राजकीय वैर आता कायमस्वरुपी इतिहासजमा होणार आहे. आमदार तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे मोठे जावई आहेत. तर घुले यांचे दुसरे जावई हे आता उदयन गडाख होतील. चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादीत आहेत. तर गडाख हे शिवसेनेचे मंत्री आहेत.  या नवीन सोयरिकीचा परिणाम आगामी विधान परिषदेच्या निकालातून पहायला मिळण्याची शक्यता आहे. 

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here