ऑक्टोबरमध्ये अहमदनगर फुटबॉल सुपर लीग स्पर्धेचे आयोजन

अहमदनगर,दि.७ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – नमोह फूटबॉल क्लबच्यावतीने शहरात दि.१६ व १७ ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य अहमदनगर फूटबॉल सुपर लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगर क्लबच्या मैदानावर मोठ्या फूटबॉल लीगच्या धर्तीवर होणार्‍या या स्पर्धेतून उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आहे. पंधरा वर्षाखालील खेळाडूंना यात सहभागी होता येणार आहे. नोंदणी केलेल्या खेळाडूंची लिलाव पध्दतीने संघात निवड केली जाईल. सर्व खेळाडूंना तज्ज्ञांमार्फत दहा दिवसांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे, अशी माहिती नमिता फिरोदिया यांनी दिली.

नगरच्या क्रीडा विश्वाला चालना देण्यासाठी नमोह फौंडेशनने नेहमीच विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. फूटबॉलमध्ये नगरमध्ये अनेक गुणी खेळाडू तयार होत आहेत. त्यांच्यासाठी ही सुपर लीग चांगले व्यासपीठ ठरणार आहे. स्पर्धेत एकूण ८ संघांना प्रवेश दिला जाणार आहेत. दोन ग्रुपमध्ये मिळून एकूण १०० खेळाडू यात सहभागी होतील. ९ अ साईड पध्दतीने बाद फेरीचे सामने होणार आहेत. प्रत्येक सामना ३० मिनिटांचा असणार असून ३ रोलिंग सबस्टीट्युटची संधी प्रत्येक संघाला असेल. दि.२३ ते २५ सप्टेंबर या कालावधीत नोंदणी केलेल्या खेळाडूंना पाचारण करून त्यांच्या क्षमतेनुसार त्यांना ग्रेडस दिल्या जाणार आहेत.

संघ निवड लिलाव दि.२७ ते २९ सप्टेंबर या कालावधीत होईल. दि.३० सप्टेंबर रोजी टिम मालकांना स्वत:चा बॅनर दिला जाईल. प्रत्येक टिमसाठी व्यावसायिक प्रशिक्षक दिला जाणार असून प्रत्येक टिमचे दहा दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण होईल. टिममधील प्रत्येक खेळाडूला चांगल्या दर्जाची टिम जर्सी दिली जाणार आहे. याशिवाय सामन्यावेळी एनर्जी ड्रींकही दिले जाणार आहे. अतिशय व्यावसायिक पध्दतीने ही स्पर्धा होणार आहे. यात प्रत्येक खेळाडूला अनुभवाची मोठी शिदोरी प्राप्त होईल. ज्याचा फायदा त्यांना भविष्यात  फूटबॉलमध्ये प्रगती करताना होणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ९६६१०४०४२४ या क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here