अण्णा हजारे यांचा राज्य सरकारला उपोषणाचा इशारा

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री निर्णय युवा पिढीसाठी घातक

अहमदनगर,दि.६ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – महाविकास आघाडी सरकारने सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या निषेधार्थ प्राणांतिक उपोषणाचा इशारा देणारे पत्र ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी धाडले होते. मात्र या पत्राची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या दोघांनीही दखल घेतलेली नाही. हजारे यांच्या पत्राला दोघांनीही उत्तरच दिलेले नाही. त्यामुळे हजारे यांनी पुन्हा दोघांना स्मरणपत्र पाठवले आहे. याबाबतची तारीख जाहीर केली नसली तरी राज्यात एकाचवेळी आंदोलन होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

हजारे यांनी पत्रात म्हटले आहे, की सुपरमार्केटमध्ये वाईन विक्रीला ठेवण्याचा परवाना देण्याचा निर्णय राज्यासाठी अत्यंत दुर्दैवी व भावी पिढय़ांसाठी घातक आहे. या निर्णयाबद्दल सरकारचा निषेध करण्यासाठी प्राणांतिक उपोषणाचा निर्णय घेतला आहे. त्यासंबंधाने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना रजिस्टर पोस्टाने पत्रव्यवहार केला. मात्र त्यांनी उत्तर दिले नाही. राज्यात माझे उपोषण होईल, त्या वेळी कार्यकर्त्यांनी माझ्याप्रमाणे उपोषण करू नये. राज्य मंत्रिमंडळाने सुपर मार्केटमध्ये वाईनच्या विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटल्या. या निर्णयास विरोधीपक्ष आणि अनेक संघटनांनी विरोध केला आहे. आता याविरोधात आंदोलन करण्यासाठी अण्णा हजारे सरसावले आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here