क्रुज ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला दि.२० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात रहावे लागणार आहे. प्रदीर्घ सुनावणीनंतर आज न्यायालयाने निकाल राखून ठेवला. क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर गुरुवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. आर्यन खानच्या वतीने अमित देसाई आणि सतीश मानेशिंदे तर एनसीबीच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) अनिल सिंह यांनी युक्तिवाद सादर केला. त्यामुळे आर्यन खानला पुन्हा एकदा पुढील काही दिवस तुरुंगात काढावे लागणार आहेत. याआधी आर्यनची याचिका फेटाळण्यात आली होती, मात्र यावेळी याचिकेवरील निर्णय राखीव ठेवण्यात आला आहे.

एनसीबीने त्याला दि.२ ऑक्टोबर रोजी ताब्यात घेतले होते आणि चौकशीनंतर त्याला अटक केली. आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. सुनावणीदरम्यान, एनसीबीचे हजर असलेले अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह म्हणाले की, प्राथमिक तपासात आरोपींचे आंतरराष्ट्रीय दुवे समोर आले आहेत. सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत. आपण त्यांना स्वतंत्रपणे पाहू शकत नाही. आमच्याकडे व्हॉट्सअॅप चॅट आणि इतर पुरावे आहेत. अनिल सिंह म्हणाले की, आर्यन खानबद्दल प्राप्त झालेले जबाब दर्शवतात की तो गेल्या काही वर्षांपासून त्याचा वापर करत होता. अरबाजकडून ड्रग्ज सापडले आहेत. आर्यन त्याच्यासोबत होता. हे दोघेही ड्रग्ज घेणार होते हे पंचनाम्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे. कोर्टाने अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, नुपूर सतिजा, अक्षित कुमार, मोहक जयस्वाल, श्रेयस अय्यर आणि अविन साहू यांच्या जामीन अर्जावर सुनावणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here