श्रीमती अर्चना डावखर यांना विखे साहीत्य पुरस्कार प्रदान

शेवगाव,दि.६ सप्टेंबर,(प्रतिनिधी)
शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील साहीत्यिक आणि कवियत्री श्रीमती अर्चना बाबुराव डावखर यांना सन २०२० चा ‘पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहीत्य पुरस्कार’ आज बोधेगाव येथे श्रीमती डावखर यांच्या घरी प्रदान करण्यात आला. स्मृती चिन्ह, पैठणी साडी, शाल पुष्पगुच्छ आणि दहा हजार रुपयाचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पदमश्री विठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे जेष्ट संचालक ॲड.भानुदास पाटील तांबे, सतिषराव ससाणे, दिलीपराव कडू पाटील, विखे पाटील शिक्षण समुहाचे शिक्षण संचालक भाऊसाहेब पाटिल जऱ्हाड, शेतकी अधिकारी किशोर आहेर यांनी श्रीमती डावखरे यांना हा पुरस्कार प्रदान केला.

यावेळी बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे, माजी सरपंच सौ. प्रितीताई अंधारे, पत्रकार बाळासाहेब खेडकर, अनिल कांबळे उपस्थित होते.
कोरोना महामारीमुळे पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या घरीच पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय पुरस्कार निवड समितीने घेतला असल्याची माहिती ज्येष्ठ संचालक भानुदास पाटील तांबे यांनी दिली.

श्रीमती अर्चना डावकर यांचे आतापर्यंत ‘सुरवंट’ ही कादंबरी आणि ‘अधांतरीचे प्रश्न’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. तसेच ‘उन्हं उतरणीच्या सावल्या’ हा काव्यसंग्रह आणि ‘पिंजर’ ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या प्रकल्प २१ अंतर्गत २१व्या शतकातील स्त्री जाणिवा असलेल्या कवियत्रीच्या कविता एक अभ्यास यामध्ये बाईचे सोभाग्य या कवितेचा समावेश करण्यात आलेला आहे. श्रीमती डावखरे यांनाआत्तापर्यंत स्त्रीप्रतिष्ठा सन्मान पुरस्कार सांगली, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जुन्नर यांचा शिवांजली साहित्य गौरव पुरस्कर, कुसुमाग्रज साहित्य गौरव पुरस्कार श्रीरामपूर, साहित्य ज्योती पुरस्कार बीड, अक्षरोदय काव्य गौरव पुरस्कार नांदेड, सुखदा नागेश ऋषी स्मृती पुरस्कार पुणे, दैनिक सार्वमत अहमदनगरचा कर्मयोगीनी पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळालेले आहेत. श्रीमती डावकर यांना त्यांच्या ‘अधांतरीचे प्रश्न’ या काव्यसंग्रहासाठी आजचा हा अहमदनगर जिल्हा उत्कृष्ट साहित्य पुरस्कार मिळालेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here