अहमदनगर,दि.९ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – राज्य सरकारने कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे काल निर्बंध लावण्याची घोषणा केली. यात सलून म्हणजेच केश कर्तनालय सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली, मात्र ब्युटी पार्लर आणि जीम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. यावरून राज्यात मोठा वाद निर्माण झाला. सोशल मीडियावर यावरून अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अखेर राज्य सरकारने वादात सापडलेल्या या निर्बंधांमध्ये बदल करत सुधारित आदेश जारी केले आहेत.
जिम, ब्युटी सलूनच्या बाबतीत निर्बंधांचे सुधारित आदेश pic.twitter.com/E0VhZmFSqx
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 9, 2022
कोरोनाच्या वाढत्या संसर्गानंतर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये आता सलून, ब्युटी पार्लर आणि जीम संदर्भातील निर्बंधात बदल करण्यात आला आहे. याबाबतचे नवे आदेश रविवारी जारी करण्यात आले आहेत. १० जानेवारीपासून हे आदेश लागू होणार आहेत. ब्युटी सलून आणि हेअर कटिंग सलून ५० टक्के क्षमतेसह सुरु ठेवता येईल. तसंच जीमसुद्धा ५० टक्के क्षमतेनं सुरु ठेवता येणार आहे. याआधी दोन्ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते,
सौंदर्य सलूनसाठी ५० टक्के क्षमतेसह उघडे राहण्याची परवानगी दिली जाईल. सलूनमध्ये मास्क काढता येणार नाही. फक्त अशाच कामांना परवानगी असेल ज्यांना कोणाला मास्क काढण्याची गरज नाही. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. सलून मधील कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील.
जिमसंदर्भातही असेच आदेश देण्यात आले आहेत. मास्क वापरण्याच्या अटीवरच ५० टक्के क्षमतेसह जिम उघडे ठेवण्याची परवानगी आहे. केवळ पूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच या सेवा वापरण्याची परवानगी असेल. मात्र, व्यायाम करताना मास्क वापरणे आवश्यक असणार आहे. जिमचे सर्व कर्मचारी पूर्णपणे लसीकरण केलेले असतील.