भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल भनगडे सहकाऱ्यासह राष्ट्रवादीत दाखल

माजी आमदार कर्डीले देखील वाटेवर…चर्चांना उधाण

राहुरी,दि.२ मार्च,(बाळकृष्ण भोसले)
भारतीय जनता पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते भनगडे यांचा सत्कार करण्यात आला. पक्ष प्रवेश सोहळा मुंबई येथे पार पडला. भनगडे यांचेसह उपसरपंच पोपटराव कोबरणे, गणेगाव सोसायटीचे अध्यक्ष बापू कोबरणे, माजी उपसरपंच गंगाधर कोबरणे, मंजाबापू कोबरणे, सोसायटीचे सदस्य भाऊसाहेब कोबरणे, बबनराव कोबरणे यांचा सत्कार करत प्रवेश दिला.

यावेळी सुयोग नालकर, अनिल घाडगे, गंगाधर हारदे, बापू जगताप, पप्पू माळवदे, भारत भुजाडी, किरण गव्हाणे, संतोष आघाव, राजेंद्र बोरकर आदी उपस्थित होते. या घडामोडींमुळे राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली असून भारतीय जनता पक्षाला दिवसेंदिवस खिंडार पडत चालले आहे. गेल्या चार दिवसापूर्वी भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष व उपसरपंच दिपक वाबळे वरशिंदे ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता. आता थेट तालुकाध्यक्ष यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने
तालुका भाजपा मध्ये खळबळ उडाली असून आणखी कोण प्रवेश करणार याविषयी कुजबूज सुरू झाल्या आहेत. अनेक दिवसापासून माजी आमदार शिवाजी कर्डिले राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा झडत आहेत त्यातच आता तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांनी प्रवेश केल्याने अनेकांच्या नजरा आता कर्डिले यांच्या कडे वळाल्या आहेत.

कर्डिले यांचे कट्टर समर्थक राहुरीचे नगरसेवक शहाजी जाधव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता तालुकाध्यक्ष भनगडे यांनी प्रवेश केल्याने चर्चेला उधाण आले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, विविध सहकारी सेवा संस्था यांच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे त्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाने वेग घेतला आहे. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेशाचा धडाका उडविला असून विरोधकांच्या पोटात भीतीचा गोळा उठविला आहे. आगे आगे देखो होता है क्या असे सूचक विधानही येऊ लागले असल्याने कोणत्या घडामोडी होतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. मंत्री तनपुरे हे
विकास कामे करताना कोणताही गट न पाहता विकासाला प्राधान्य देतात. त्यांच्या या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये वेगळीच प्रतिमा निर्माण होत असून त्यांच्याबद्दल आकर्षण वाढत चालले आहे. त्यातूनच भारतीय जनता पक्षात रामराम करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here