त्याच सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील सुनावले होते खडे बोल
कर्जत,दि.१८ नोव्हेंबर,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) – गेल्या अनेक वर्षांपासून कर्जत बाजारतळात लिंबाचे झाड सावली पुरवत असताना परवाच्या भूमिपूजन सभेला राज्य सरकारमधील मंत्री उपस्थित राहणार असल्याच्या कारणाने सभेच्या मंडपास अडथळा होणाऱ्या फांद्या तोडल्याचा भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी निषेध केला. या कार्यक्रमात खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लिंबाच्या झाडाच्या फांद्या तोडल्या म्हणून बारामती ऍग्रोचे पदाधिकारी यांना जाहीर सभेत खडे बोल सुनावले होते.

शनिवार, दि १३ रोजी कर्जत येथे विविध विकासकामाचे भूमीपूजन प्रसंगी कर्जतच्या बाजारतळात महाविकास आघाडीकडून जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या ठिकाणी अनेक वर्षांपासून एक मोठे लिंबाचे झाड उभे आहे. वर्षानुवर्षे दाट सावली पुरविणारे त्या लिंबाचे झाडाच्या फांद्या मंडपास अडथळा ठरत होते. यावेळी चक्क त्या फांद्याच तोडण्याचा प्रकार झाला. तोडलेल्या फांद्या कोणाच्या निदर्शनास पडू नये याकरिता त्यास फुलांच्या माळा लावण्यात आल्या होत्या. मात्र तरी त्या फांद्या तोडलेले असून त्यास सजावट करण्यात आली असल्याचे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या भाषणात बारामती ऍग्रोच्या पदाधिकाऱ्यांचा भर सभेत समाचार घेतला.
काल सदरची बाब पुन्हा हेरत भाजपाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे यांनी याच मुद्यावर घेरत सोशल मीडियावर आवाज उठविला. यासह पत्रकारांना प्रसिद्धी पत्रक काढले. एकी कडे राज्य सरकार झाडे लावा-झाडे जगवा, माझी वसुंधरा सारखे महत्वपूर्ण प्रकल्प हाती घेत पर्यावरण संवर्धन करीत असताना त्याचेच सहकारी लोकप्रतिनिधीची माणसे झाडे तोडत आहे हे निषेधार्थ आहे. दबावाच्या व दडपशाहीच्या राजकारणात फुटणारी माणसे फोडली तरी चालतील पण गेली अनेक वर्षे कर्जत शहराला सावली देणाऱ्या या झाडांना तोडले तर…आम्ही गप्प कसे बसू शकतो.? असा सवाल उपस्थित केला.
“गेल्या अनेक महिन्यापासून सर्व सामाजिक संघटना कर्जत यांनी कर्जत शहर-हरीत शहर यासाठी मोठी मेहनत घेतली आहे. रेकॉर्डब्रेक काम करीत असल्याचा एक कर्जतकर म्हणून आपणांस अभिमान आहे. मात्र परवा याच कर्जत शहरात केवळ सभेला अडथळा ठरत आहे म्हणून फांद्या तोडणे निषेधार्थ आहे. प्रशासन पूर्णपणे यांच्या हाताशी असल्याने कारवाई होईल याची शाश्वती फार कमी आहे. मात्र ज्या महत्वकांक्षेने या बिगर राजकीय सर्व सामाजिक संघटनेने हे कार्य पुढे चालवले आहे त्या कार्याला असे गालबोट लागू नये ही सद्गुरू गोदड महाराज चरणी प्रार्थना.”
– सचिन पोटरे, (जिल्हा प्रसिद्धी प्रमुख – भाजपा)