मराठी राजभाषा दिनानिमित्त धर्मवीर ग्रामीण वाचनालयास पुस्तकांची भेट

अहमदनगर,दि.२६ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – ज्ञानाचा कायमस्वरूपी ठेवा पुस्तकरुपाने टिकवता येतो. ज्ञानाचा मुख्य स्त्रोत म्हणून पुस्तकाचे महत्त्व आजही टिकून आहे. मनुष्याला सुसंस्कृत बनविण्याकरीता पुस्तके भावी पिढीत विचार रुजवतात. पुस्तकांनी माणुस घडतो, व्यक्ती म्हणून त्याचा विकास होतो. युवा वर्ग मोबाईलमध्ये गुरफटल्याने वाचन संस्कृती लोप पावत असून, वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी शब्दगंध साहित्यिक परिषद प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन परिषदेचे संस्थापक सचिव सुनिल गोसावी यांनी केले.

मराठी राजभाषा दिनानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने पुस्तके भेट देण्यात आली. यावेळी गोसावी बोलत होते. याप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, माजी सरपंच साहेबराव बोडखे, प्रशांत जाधव, मयुर काळे, ऋषीकेश पाचारणे, अभिजीत पाचारणे, ज्ञानदेव जाधव आदी उपस्थित होते.

प्रास्ताविकात पै. नाना डोंगरे यांनी ग्रामीण भागात वाचन संस्कृती पुन्हा बहरण्यासाठी धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने प्रयत्न सुरु आहे. शब्दगंध साहित्यिक परिषदेने नेहमीच वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी कार्य केले असून, यापुर्वी देखील त्यांची मदत मिळाली असल्याचे स्पष्ट केले. माजी सरपंच साहेबराव बोडखे म्हणाले की, गावातील युवकांना वाचनालयाच्या माध्यमातून दिशा मिळणार आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करुन ग्रामीण भागातील युवकांना एकप्रकारे प्रोत्साहन देण्याचे कार्य करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.     तसेच गोसावी यांनी धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास भेट देऊन पहाणी केली.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here