महावितरण सारख्या कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा केंद्राचा घाट – ना. प्राजक्त तनपुरे

चिंचोलीत तनपुरेंचा जनता दरबार

राहुरी,दि.१ फेब्रुवारी,(बाळकृष्ण भोसले) – मागील सरकारने महावितरणची शेतीविजबिल वसूली केली नाही बदल्यात महावितरणला पैसेही दिले नाहीत म्हणून या कंपनीचे अस्तित्वच धोक्यात आले. केंद्र सरकार अशा कंपन्याचे खाजगीकरण करण्याचा घाट घालत आहे. महाविकास आघाडी सरकार मात्र या धोरणाविरोधात असून शेतकरी व सर्वसामान्यांचे हित जपणाऱ्या अशा कंपन्या उर्जितावस्थेत ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांनीही सहकार्याची भुमिका ठेवण्याचे प्रतिपादन राज्याचे उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केले.

तालुक्यातील चिंचोली येथे आयोजित जनता दरबार प्रसंगी ते बोलत होते. प्रसंगी सरपंच गणेश हारदे, प्रांताधिकारी, तहसीलदार फसियोद्दीन शेख, जलसंपदा अहमदनगरचे कार्यकारी अभियंता गणेश नान्नोर, गटविकास अधिकारी, पाटबंधारे विभागाचे सोनगाव शाखा अभियंता संजय सिनारे, महावितरणचे सहाय्यक अभियंता ठुबे, कनिष्ठ अभियंता गाडे, सुनील निमसे, वसंतराव कोळसे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना मंत्री तनपुरे म्हणाले मतदार संघात जनता दरबाराच्या माध्यमातून सर्वसामान्य कष्टकरी, श्रमजीवी, शेतकरी व महिला, विद्यार्थ्यांचे शासकीय कामे सर्वच विभागाकडे प्रलंबित असलेले अनेकविध प्रश्न समजावून घेऊन ते जागेवरच सोडविले जावेत म्हणून जनता दरबार भरविण्याचा हा प्रयत्न आहे. त्यानुषंगाने जनतेशी प्रत्यक्ष संवाद होवून अडीअडचणी सोडवता येतात.

महावितरणच्या वीजबिल वसूली संदर्भात बोलताना ते म्हणाले, महावितरण शासनाची कंपनी आहे, शासन नाही. मागील सरकारने वीजबिले दिली नसल्याने कंपनीची ३० हजार कोटीची थकबाकी वाढली. बदल्यात शासनाने गत ५ वर्षात महावितरणला अवघे ३ हजार कोटी दिले. किमान निम्मे अनुदान तत्कालीन सरकारने दिले असते तर कंपनी धोक्याच्या पातळीबाहेर राहिली असती. परंतू ‘आपणही काही करायचे नाही नि दुसऱ्याला करु द्यायचे नाही’ या प्रव्रुत्तीमुळे मुळा प्रवरेसारखेच महावितरणलाही संपविण्याचा घाट मागील सरकारबरोबरच केंद्राचा असून हे षड्यंत्र हाणून पाडण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न राहिला आहे. शेतकऱ्यांनी सर्व थकबाकी एकत्रित न भरता त्याचे टप्पे करुन भरण्यासाठी उर्जा विभागाने सवलतीची योजना जाहीर केली आहे. या योजनेचा फायदा घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

चिंचोलीतील थकबाकीदार शेतकऱ्यांकडून सद्यस्थितीत ३ एच.पी. साठी ५ हजार तर ५ एच.पी. साठी साडेसात हजार रुपये पहिल्या टप्प्यात भरुन घेऊन बंद केलेली वीजरोहित्रे पुन्हा सुरू करण्याचे आदेश त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. तर आपण वीजबिले घेता तशी अद्ययावत सुविधा देण्यात आपण असमर्थता दर्शविली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तंबी देण्यासही ते विसरले नाहीत.
तालुक्यातील तीन गावातील सौरप्रकल्प पुर्णत्वाच्या उंबरठ्यावर असून चिंचोलीच्या सौरप्रकल्पासाठी सर्व ते प्रयत्न करुन लवकरच हा प्रकल्प कार्यान्वीत करण्यासाठी आग्रही राहणार असल्याचेही ते म्हणाले. या जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेचे बहुतांशी प्रश्न जागेवरच सोडविण्यात आल्याने गोरगरीब, कष्टकरी जनतेच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना पहावयास मिळाला.
प्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल शिरसाठ, संजय भोसले, जालिंदर काळे, महेबुब शेख, गोपीनाथ वर्पे, मच्छिंद्र हुरुळे, विष्णुपंत वर्पे, जगन्नाथ वर्पे, गंगापुरचे सरपंच सतीश खांडके, शाकीर शेख, सुधाकर पठारे, सर्जेराव लाटे, कचेश्वर काळे आदिंसह सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ना. तनपुरेंचा जनता दरबार विखेंचे प्राबल्य असणाऱ्या व श्रीरामपूर मतदार संघातील चिंचोलीत भरविण्यात आला होता. एरवी विळ्याभोपळ्याचे नाते सांगणाऱ्या प्रवरा पट्ट्यातील या गावांमधून विखेंचे धुरंधर अनेक चेहरे तनपुरेंच्या या कार्यक्रमात चमकले. त्यामुळे मात्र राजकीय जाणकारांमधून आश्चर्य व्यक्त होत आहे.


हे ही वाचा…

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here