नाट्य कलावंत रियाज पठाण यांची एकल कलाकार मानधन समितीवर निवड

अहमदनगर,दि.२९ मार्च,(प्रतिनिधी) – पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासन एकल कलाकार मानधन निवड समिती अहमदनगरच्या अशासकीय सदस्यपदी नाट्य कलावंत व निवेदक रियाज पठाण यांची निवड झाली आहे. रियाज पठाण यांना निवडीचे पत्र समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, समिती सदस्य सचिव तथा अति. मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. अहमदनगर संभाजी लांगोरे यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी समितीचे सदस्य तथा जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, समिती सदस्य तथा जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, सदस्य भगवान राऊत, डॉ. श्याम शिंदे, हमीद सय्यद, आरती जाधव आदी उपस्थित होते. पठाण हे गेली २७ वर्षे नाट्यक्षेत्रात कार्यरत असून ऑर्केस्ट्राच्या माध्यमातुन मनोरंजन व प्रबोधन करत आहेत. असंघटित कलाकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते शासनाकडे प्रयत्न करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची शासनाने या समितीवर निवड केली आहे.

कोरोना काळात सांस्कृतिक व कलाक्षेत्रातील संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील विविध कलाकार ज्यांचे उपजीविकेचे साधन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम व कला सादर करणे आहे त्यांची आर्थिक कुचंबना झाली होते. आशा संघटित व असंघटित क्षेत्रातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील कलाकारांना शासनाच्या वतीने एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. उदा. तमाशा, शाहीर, भारुडकार, खडी गमत, वासुदेव, पोतराज, नाट्यकलाकार, चित्रकथी, बहुरूपी, ऑर्केस्ट्रा (कलापथक) कीर्तनकार, प्रबोधनकार, स्थानिक ठिकाणी आढळणारे प्रयोगात्मक कलाप्रकारातील केवळ कलेवर उदरनिर्वाह असणारे आर्थिक दृष्ट्या दुर्बल कलाकार यांना ही एकरकमी आर्थिक मदत देण्यात येणार आहे. या निवडीबद्दल पठाण यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here