विक्रमी ऊस उत्पादन देणारे सर्व वाण कृषि विद्यापीठाचे, कुलगुरुंनी केला शेतकऱ्यांचा सत्कार

राहुरी,दि.१२ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – सांगली जिल्ह्यातील कुंडल येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादन वाढीच्या कार्यक्रमास गती मिळावी व शेतकऱ्यांमध्ये उच्चांकी उत्पादन घेण्यासाठी निकोप स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी हंगामनिहाय एकरी विक्रमी ऊस उत्पादन घेणार्या शेतकऱ्यांचा सहकुटुंब गौरव केला जातो. सन २०२०-२१ या कालावधीत ऊस पुरवठा केलेल्या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा पुरस्कार वितरण व गुणगौरव सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणुन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषद सदस्य तथा क्रांती उद्योग व शिक्षण समुहाचे प्रमुख आ. श्री. अरुण (अण्णा) लाड, भाभा अणु संशोधन केंद्र, मुंबईचे माजी शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. श्री. शरद काळे उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमात सन २०२०-२१ या गळीत हंगामात हंगामनिहाय कारखाना कार्यक्षेत्रातील प्रति एकरी जास्त ऊस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये आडसाली हंगामात को-८६०३२ वाणाचे प्रकाश चव्हाण (तांदळगाव) यांनी प्रति एकरी ११३ मे. टन, भगवान होनमाने (देवराष्ट्रे) यांनी १११ मे. टन आणि केदारी कदम (शेळकबाव) यांनी १०४ मे. टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. पुर्व हंगामात मोहन जगदाळे (आंधळी) यांनी फुले १०००१ या वाणाचे प्रति एकरी ९३ मे. टन, नाना चव्हाण (तांदळगांव) यांनी ८७ मे. टन आणि राजाराम पाटील (बोरगांव) यांनी को-८६०३२ या वाणाचे प्रति एकरी ८१ मे. टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. सुरु हंगामात कृष्णा भोसले (बांबवडे) यांनी को-८६०३२ या वाणाचे प्रति एकरी ७६ मे. टन, प्रशांत चौगुले (भिलवडी) यांनी फुले १०००१ या वाणाचे प्रति एकरी ६२ मे. टन आणि भिकू जाधव (हिंगणगांव) यांनी फुले ०२६५ या वाणाचे प्रति एकरी ६१ मे. टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. खोडवा हंगामात को-८६०३२ वाणाचे आप्पासाहेब जाधव (आसद) यांनी प्रति एकरी ७१ मे. टन, अमर जाधव (कुंभारगांव) यांनी ६९ मे. टन आणि मारुती माळी (कुंडल) यांनी ६६ मे. टन इतके उत्पादन घेतले आहे.

अशा प्रकारे महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ऊस वाणांचे शेतकऱ्यांनी विक्रमी उत्पादन घेतले आहे. या निमित्त शेतकऱ्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना गौरविण्यात आले.  शेतकऱ्यांना शेती करतांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. सध्या हवामान बदलाचा सर्वात मोठा फटका शेती आणि शेतकऱ्यांना बसत आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीतही तंत्रज्ञानाच्या सहाय्याने आणि मोठ्या कष्टाने ऊस वाणांचे विक्रमी उत्पादन घेवून पुरस्काराला पात्र ठरलेले शेतकरी खरोखरच कौतुकास पात्र आहेत. या सर्व शेतकर्यांनी राहुरी कृषि विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने तयार केलेल्या उसाच्या वाणांची निवड केलेली आहे. यामुळे पर्यायाने सर्वोत्कृष्ट ऊस वाण तयार करणारे पाडेगाव ऊस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञांचाही गौरव झाला आहे असे मी समजतो असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष श्री. उमेश जोशी, कार्यकारी संचालक श्री. चंद्रकांत गव्हाणे तसेच शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here