दोन वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशोब एकदा सांगाच – राम शिंदे

भाजपाचे शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल

कर्जत,दि.६ डिसेंबर,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) – खर्डा किल्यावरील स्वराज्य ध्वज हा बारक्या पवारांचा आहे. त्यामुळे दोन्ही मोठे पवार साहेब त्या कार्यक्रमास आले नाहीत. भगवा ध्वज हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. तो माझ्या वारकरी बंधुचा आहे मात्र यांनी तो स्वतःचा केला. त्यामुळे १८ दिवसांतच तो फाटला आणि आता फक्त तेथे दांडाच शिल्लक राहिला. जातीपातीचे राजकारण करायचे आणि आपली राजकीय पोळी भाजायची असे विद्यमान लोकप्रतिनिधी करीत आहे. यांनी दोन वर्षात काय विकासाचे काम केले आहे ते एकदा आमने सामने झालेच पाहिजे असे म्हणत राम शिंदे यांनी आ.रोहित पवार यांना खुले आव्हान दिले. ते कर्जत येथे भाजपाच्या उमेदवारी अर्ज दाखल प्रसंगी बोलत होते.

यावेळी खा.सुजय विखे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, जामखेडचे अजय काशीद, रवी सुरवसे आदी उपस्थित होते. सोमवारी दुपारी भाजपाने मोठे शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी पुढे बोलताना माजीमंत्री राम शिंदे म्हणाले की, आपण विधानसभेत सांगितल्याप्रमाणे कर्जत शहराचे सर्व प्रलंबित प्रश्न प्रामाणिकपणे सोडविले. मंत्रीपदाचा भार घेतल्यावर सर्वप्रथम कर्जतचा पाणी प्रश्न तात्काळ सोडविला. यासह सर्व प्रभागात अनेक रस्ते, स्मशानभूमी, गार्डन, चौक सुशोभीकरण कामे मार्गी लावले. त्यामुळे आपल्याला कर्जतच्या जनतेला मते मागण्याचा नैतिक अधिकार आहे. त्यामुळेच यंदाची कर्जत नगरपंचायतीची निवडणूक सर्वसामान्य जनतेच्या हाती दिली आहे. 

दोन वर्षात आपण पत्रकार परिषद घेत मतदारसंघातील समस्या मांडल्या मात्र विद्यमान आमदारांनी त्यास देखील उत्तर दिले नाही. यातच त्यांचे काम आणि त्यांची हतबलता दिसते. सध्या मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांचे जमिनीचे सातबारा उतारे धोक्यात आहे. कर्जत शहरात दोन राजकीय पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र त्यांना देखील भेट देत नाही हाच लोकप्रतिनिधीचा विकास आहे. सध्या ते फक्त गप्पा मारण्याचे काम करून जनतेला फसवीत आहे. लोकांना दिलेला शब्द त्यांनी प्रामाणिकपणे पाळावा. सर्वसामान्य जनतेला दबावाखाली आणू नका, हा राम शिंदे या जनतेसाठी जीवाची बाजी लावून पुढे उभा राहील. आता जनता दडपशाही, मुस्कटदाबी सहन करणार नाही. या निवडणुकीत भूलथापाना बळी पडू नका विकासकामे मनात ठेवून भाजपाला साथ द्या अशी साद राम शिंदे यांनी मतदारांना घातली. आपण अभिमानी आणि स्वाभिमानी आहोत याची प्रचिती कर्जतकरानी विरोधकांना द्यावी असे आवाहन केले.          

खा.सुजय विखे म्हणाले की, ज्या माणसाने मोठे करून विविध पदे दिली. आज त्यानीच राम शिंदेचा विश्वासघात केला. त्यामुळे आजची निवडणूक ही भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी किंवा महाविकास आघाडी अशी नसून ती विश्वासघातकी माणसाची लायकी दाखविणारी आहे. राम शिंदे यांच्या पाठीमागे जनता उभी राहणार आहे. कारण त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी काम केले आहे. आमचे उमेदवार स्वच्छ आणि प्रामाणिक आहे. ते सर्वसामान्य नागरिकांच्या हवाली केले आहे. त्यामुळे जनतेनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन खा विखे यांनी उपस्थित जनतेला केले. विरोधकानी प्रदीर्घ काळ नुसते इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी लावला. याचाच अर्थ त्यांनी राम शिंदे आणि भाजपाचा मोठा धसका घेतला आहे हे अधोरेखित होत असून आगामी निवडणुकीत भाजपला साथ द्यावी असे म्हंटले.        

प्रास्ताविक करताना नुतन जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे म्हणाले की, माजीमंत्री राम शिंदे यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळात विकासाची कामे झाली. या विकासकामामुळे कर्जत शहराचा चेहरा-मोहरा बदलला. खा.सुजय विखे यांनी देखील आपल्या कार्याने त्यावर कळस उभा केला आहे. त्यामुळे कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता कायम राहील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, भाजपाचे युवा नेते सुवेंद्र गांधी, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, आरपीआयचे शशिकांत पाटील, दादासाहेब सोनमाळी, अल्लाउद्दीन काझी, वैभव शहा, अंबादास पिसाळ, अशोक खेडकर यांची भाषणे झाली. याप्रसंगी इच्छुक उमेदवार, राजकीय पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने भाजपा समर्थक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश जेवरे यांनी केले तर आभार अनिल गदादे यांनी मानले.


साहेब आता तरी सुधरा – खा.सुजय विखे    

साहेब तुम्ही अनेकांना मोठे केले. त्यांनी तुमचा विश्वासघात केला. उद्या परत तुम्ही आमदार होणार पण आता तुमच्या स्वभावात बदल करा. जे आपले आहे त्यांना सोबत घ्या. आणि जे दूर गेले त्यांना दूरच राहू द्या. कारण तुम्ही फार साधे व्यक्ती आहात पण आपल्या सोबत असणाऱ्यानी आपल्याला दगा दिला. पण मी थोडा वेगळा आहे. मी ज्यांनी दगा दिला त्यांचा हिशोब केल्याशिवाय राहणार नाही. कारण मी विखे घराण्याचा माणूस आहे असे म्हणत पक्षांतर केलेल्या सुचक इशारा दिला. 


त्यांचे काम फक्त दमदाटी करणे आणि पक्षात घेणे – सुवेंद्र गांधी                 

माजीमंत्री राम शिंदे यांनी आपल्या मंत्रीपदाचा वापर करत कर्जत शहराचा चेहरा बदलला. परिसरातील विकासकामे पाहता आगामी निवडणुकीत भाजपा भरघोस यश संपादन करेन असा विश्वास वाटतो. विरोधकांनी दोन वर्षात सर्वसामान्य जनतेसाठी काहीच केले नाही. त्यांनी फक्त मतदारसंघात दहशत आणि दमदाटी करून लोकांना आपल्या पक्षात सामील केले असे मत व्यक्त केले. 


भाजपात असणारा टायगर राष्ट्रवादीत म्याव म्याव करायला लागला – जिल्हाध्यक्ष मुंढे             

राम शिंदे यांनी विश्वास टाकून प्रथम नगराध्यक्ष केले. स्थानिक भाजपात मोठे पद दिले. भाजपात असताना तो टायगर म्हणून वावरत होता. मात्र पक्षातून तिकडे गेला आणि म्याव म्याव करायला लागला असे नामदेव राऊत यांचे नाव न घेता भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांनी टीकास्त्र सोडले. विद्यमान आमदार फक्त लबाडी करण्यात धन्यता मानतात. जनतेला फसविण्यात हे तरबेज असे म्हणत आ.रोहित पवार यांना टोला लगावला. 


Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here