एसटी कामगार संघटनेने गुणरत्न सदावर्ते यांना हटवले

अहमदनगर,दि.११ जानेवारी,(प्रतिनिधी) – एसटी कर्मचार्‍यांच्या विलीनीकरणाची न्यायालयीन लढाई लढणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांची एसटी कामगार संघटनेने हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी आता ठाण्याचे वकील सतीश पेंडसे हे न्यायालयीन लढाई लढणार आहेत. सोमवारी एसटी कामगार कृती समितीची राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत कामगार कृती संघटनेने गुणरत्न सदावर्ते यांना हटवण्याची घोषणा केली.

एसटी विलीनीकरणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. आमच्यातर्फे आम्ही गुणरत्न सदावर्ते यांची नेमणूक केली होती. मात्र, आता आम्ही त्यांना पत्र देत त्यांची नेमणूक मागे घेतल्याचे सांगितले आहे. तसेच, आम्ही आता नव्या वकिलाची नेमणूक केलेली आहे. पुढील सुनावणीला नवीन वकील न्यायालयात हजर राहतील, अशी माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी दिली. तसेच, सदावर्ते यांची नेमणूक करून फार मोठी चूक झाली, अशी कबुली देखील गुजर यांनी दिली.

अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या आक्रस्तळेपणामुळे सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांची चूल बंद होण्याची वेळ आल्याची टीका या संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली. गुणरत्न सदावर्ते यांनी विलीनीकरणाच्या मुद्द्यावरुन कर्मचाऱ्यांच्या मनात भ्रम निर्माण केला. त्यांच्या डोक्यात नक्की काय सुरु आहे, हे माहिती नाही. ते सांगतात की, एसटी कर्मचारी नैराश्यात गेले आहेत. पण आम्हाला गुणरत्न सदावर्ते हेच डिप्रेशनमध्ये गेल्यासारखे वाटतात, अशी टीका कास्ट ट्राईब परिवहन संघटनेचे सरचिटणीस सुनील निर्भवणे यांनी केली.

माझ्याकडे ७५ हजार कर्मचार्‍यांचे वकीलपत्र – सदावर्ते
एसटी कामगार संघटनांनी सदावर्ते यांना न्यायालयीन लढाईतून मुक्त केल्यानंतर सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली. माझ्याकडे ७५ हजाराहून अधिक एसटी कर्मचार्‍यांचे वकीलपत्र आहे. मी ७५ हजाराहून अधिक लोकांचा वकील आहे. ज्या युनियन होत्या त्या बाद झालेल्या, गुजरलेल्या युनियन होत्या. त्या युनियनकडे एक टक्काही कष्टकरी नाही आणि मान्यता रद्द झालेल्या आहेत, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here