अहमदनगर,दि.१ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – समाजमाध्यमांवर ‘हिंदूस्थानी भाऊ’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीच्या चिथावणीमुळे सोमवारी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शने केली. मुंबईतील धारावी भागात हा तथाकथित ‘हिंदूस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. धारावी पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याला अटक केली आहे. धारावी पोलिसांनी हिंदुस्तानी भाऊ अर्थात विकास पाठक याला अटक केली असून आज त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना भडकावल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणात सर्वप्रथम हिंदुस्थानी भाऊ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यानंतर त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांना करण्यासाठी विकास पाठक धारावीत आला आणि त्याच्या समर्थनासाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांनी अंडी, दगड, चपला फेकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हुल्लडबाजीमुळे परिस्थिती चिघळू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले.
नागपूरमध्येही ‘हिंदूस्थानी भाऊ’च्या आवाहनावरून क्रीडा चौक भागात हजारो विद्यार्थी दुपारी १२च्या सुमारास गोळा झाले. त्यांनी आपला मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वळवला. दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करा, शिक्षण ऑनलाइन असताना परीक्षा ऑफलाइन कशा, असा सवाल करीत, ‘हिंदूस्थानी भाऊ’चा जयजयकार करण्यात आला. मेडिकल चौक येथे मोर्चा येताच काही विद्यार्थ्यांनी बसच्या काचा फोडल्या. पोलिसांनी विद्यार्थ्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र ते हिंसक होऊ लागल्याने पोलिसांनी लाठीमार केला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.