अहमदनगर,दि.२ डिसेंबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – भारतात ओमिक्रॉन व्हेरीएंटचे दोन रुग्ण सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाचा नवा व्हेरीएंट आहे आणि आफ्रिका तसच युरोपमध्ये ह्या नव्या व्हेरीएंटनं धुमाकूळ घातला आहे. ओमिक्रॉन हा कोरोनाच्या डेल्टापेक्षा कित्येक पट घातक असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेली आहे.
कर्नाटकात सापडलेल्या दोन रुग्णांपैकी एक रुग्ण ११ तर दुसरा २० नोव्हेंबरला भारतात आला होता. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता ओमिक्रॉनचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. त्यातलाच एक रुग्ण हा ६४ वर्षाचा आहे तर दुसरा रुग्ण हा ४४ वर्षांचा आहे. विशेष म्हणजे दोन्ही रुग्ण हे पुरुष आहेत आणि चाळीस वर्षाच्या पुढं आहेत. या दोन्ही रुग्णांना सौम्य लक्षणे दिसून आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. काल रात्री या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
या संबंधीत माहिती देताना लव अग्रवाल यांनी सांगितले की ओमिक्रॉन व्हेरीएंटशी संबंधित दोन्ही रुग्णांमध्ये आतापर्यंत सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. ओमिक्रॉनने बाधित झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची ओळख पटली असून त्यांच्या आरोग्यावर डॉक्टरां लक्ष असणार आहे. तसेच सर्व बाबींमध्ये प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.