मुंबई,दि.२३ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. ईडीनं सकाळ सकाळी केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे. नवाब मलिक यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई सूडाचं राजकारण असल्याचा आरोपा मलिकांच्या समर्थकांनी केला आहे. नवाब मलिकांचे कार्यकर्ते आता मोठ्या संख्येनं ईडी कार्यालयाबाहेर पोहोचून त्यांना समर्थन देणार असल्याचं सांगितलंय.
जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीच पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू आहे.