राहुरी,दि.१६ जानेवारी,(प्रतिनिधी) – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व दुकानांवरील आस्थापना तसेच हॉस्पीटल, मोबाईल कंपनीचे जाहिरात पाट्या या मोठ्या व ठळक मराठी भाषेत असाव्यात असे आदेश काढण्यात आलेले आहेत. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जवळपास पंधरा वर्षापासून प्रयत्न करीत आहेत.
१ फेब्रुवारी पर्यंत सर्व पाट्या मराठीत करा अन्यथा मनसे स्टाईल दाखविण्याचा इशारा राहुरी कारखाना मनसे शाखेच्या वतीने देण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेले आंदोलनाला आज कुठेतरी यश येताना दिसत आहे. आपल्या शहरातील अनेक दुकाने, हॉटेल्स, हॉस्पिटल इतर सर्व आस्थापना तसेच जाहिरातदार मोबाईल कंपन्या व इतर कंपन्यांचे बोर्ड हे मराठीमध्ये नसून इंग्रजी भाषेत आहेत. त्यामुळे या सर्वांनी आपल्या पाट्या मराठीत ठळक व मोठ्या अक्षरात कराव्यात असा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ही आज विनंती आहे. जर येणाऱ्या पंधरा दिवसात शहरातील पाट्या मराठीत झाल्या नाही तर त्या सर्व पाट्या मनसे आपल्या स्टाईलने उतरवेल असे आवाहन मनविसे शहराध्यक्ष संदेश पाटोळे यांनी केले.
आपण महाराष्ट्रात राहतो. महाराष्ट्रात मराठी भाषेचा अभिमान असावा व आपण स्वाभिमानाने त्या पाट्या मराठीत कराव्यात व गर्वाने मराठी भाषेचा गौरव आपण करावा असे आवाहन देखील मनसे राहुरी फॅक्टरी शहरातील दुकानदार व मोबाईल कंपन्या व इतर सर्व दुकानदारांना केले आहे.
महाराष्ट्रात जर मराठीसाठी आपल्याला भांडावे लागत आहे. त्यामुळे मराठी भाषेचा गौरव करावा मराठी भाषेचा प्रसार व्हावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वारंवार पावले उचललेली आहेत.
तरी आपणही एक मराठी नागरिक मराठी अभिमान म्हणून आपण सर्वांनी या राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा द्यावा व आपल्या दुकान, हॉटेल, मोबाईल शॉप्स वरील तसेच इतर सर्व आस्थापना हॉस्पिटल, खाजगी क्लासेस, शाळा या सर्वां वरील पाट्या मराठीत कराव्यात अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही करत आहोत. आपण याची दखल घेतली नाही तर एक फेब्रुवारी नंतर ज्या सर्व पाट्या मराठीत नसतील त्या सर्व पाट्या काळ्या करण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करणार असल्याचं प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले आहे. हे आंदोलन मनसेच्या वतीने एक फेब्रुवारी नंतर हाती घेण्यात येईल. याची सर्व दुकाने, हॉटेल, मोबाईल शॉप्स, शाळा, खाजगी क्लासेस, हॉस्पीटल तसेच इतर सर्व आस्थापनांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन मनविसे शहराध्यक्ष संदेश पाटोळे, साहिल पठाण सह सर्व मनसैनिकांनी केले आहे.