मुंबई,दि.१८ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – सुप्रसिद्ध गायिका वैशाली भैसने हिने आपल्या जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. वैशालीच्या फेसबुक पोस्टमुळे एकच खळबळ उडाली आहे. माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं आवाहन वैशाली भैसने हिने सोशल मीडियावरुन केलं आहे. त्यानंतर चाहत्यांनी तिला काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

सारेगमप या मराठी शोची विजेती राहिलेल्या वैशालीने २००९ मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला होता. त्यानंतर ती सूर नवा ध्यास नवा, बिग बॉस मराठी या सारख्या इतर शोमध्येही झळकली आहे. नुकतंच तिने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला आहे.वैशालीने कुलवधू, होणार सून मी ह्या घरची, माझ्या नवऱ्याची बायको यासारख्या लोकप्रिय मराठी मालिकांची शीर्षकगीतं गायली आहेत. २०११ मध्ये तिला रेशमियाने दमादम चित्रपटातील हम-तुम या ड्युएट गाण्यातून बॉलिवूड पदार्पणाची संधी दिली. त्यानंतर बाजीराव मस्तानी सिनेमात श्रेया घोषालच्या साथीने तिने ‘पिंगा’ हे गाणं गायलं. हे गाणं इतकं गाजलं की वैशालीची ‘पिंगा गर्ल’ अशी ओळख निर्माण झाली. त्यानंतर तिने कलंक सिनेमात घर मोरे परदेसिया या गाण्यातही श्रेयासोबत तान छेडली.
माझ्या हत्येचा कट रचला जात आहे. दोन दिवसांनंतर पत्रकार परिषद घेऊन याचा गौप्यस्फोट मी करणार आहे. आज मला तुमच्या सपोर्टची गरज आहे, असं वैशालीने फेसबुकवर लिहिलं आहे. सारेगमप या मराठी गायन शोचे विजेतेपद २००८ मध्ये वैशालीने पटकावले होते. त्यानंतर तिने २००९ मध्ये हिंदी सारेगमपच्या विजेतेपदाचाही मान पटकावला. सोबतच झी टीव्हीशी ५० लाख रुपयांचा संगीत करार, ह्युंदाई i10 कार आणि एलसीडी टीव्ही तिला बक्षीस स्वरुपात मिळाले होते. सा रे ग म प चॅलेंज २००९ मधील तिच्या संपूर्ण प्रवासात तिने स्वतःला एक अष्टपैलू गायिका असल्याचे सिद्ध केले.