२८८ आमदारांमध्ये नीलेश लंके नंबर १..! उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कौतुकाची थाप

पारनेर,दि.२२ नोव्हेंबर,(प्रतिनिधी) – करोना संकटात जगाला काही लोक माहीती झाले, त्यात तुमच्या पारनेरचाही आमदार आहे ! नीलेशच्या रूपाने तुम्हाला चांगले नेतृत्व मिळाले आहे. करोना काळात हा गडी रूग्णांमध्ये जाउन ऐटीत बसत होता. आगोदरच सामान्य प्रकृतीचा त्यात त्याला करोना झाला तर काय ? असा प्रश्‍न मला पडायचा. त्याने केलेेले काम राज्यातील २८८ आमदारांमध्ये एक नंबरचे ठरल्याचे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काढले. नीलेशने केलेल्या कामाची ही वस्तुस्थिती आहे. माझ्या आया – बहिणींना हे समजले पाहिजे यासाठी मी हे सांगत असल्याची पुष्टीही पवार यांनी यावेळी बोलताना जोडली.

येथील संत निळोबाराय महाराजांच्या राहत्या वाडयाचा जिर्णोध्दार तसेच संत निळोबाराय महाराजांच्या गाथेचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पवार बोलत होते. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार नीलेश लंके, माजी आमदार पोपटराव गावडे, जि. प. च्या अध्यक्षा राजश्री घुले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, चैतन्य देगलूरकर, ज्ञानदेव पठारे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, संचालक प्रशात गायकवाड, अशोक सावंत, बाबाजी तरटे, सबाजी गायकवाड, विक्रमसिंह कळमकर, अ‍ॅड. राहूल झावरे, संदीप चौधरी, विजय औटी, गोपाळबुवा मकाशिर, सुभाष गाजरे, अमोल पोटे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, पोलिस अधिक्षक मनोज पाटील, प्रांताधिकारी सुधाकर भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना पवार म्हणाले, जगाला करोनाच्या संकटाने ग्रासले जाईल असे मनातही आले नव्हते. फार पुर्वी प्लेगच्या साथीमुळे अनेक लोकांचा मृत्यू झाला. त्यानंतरच्या काळात वैद्यकिय क्षेत्रात मोठया प्रमाणात संशोधन झाले. तरीही करोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातले. मी, मी म्हणणारे लोक मृत्यूमुखी पडले. आपल्या जिवाभावाचे लोक आपल्याला सोडून गेले. आजही रशीया, चिनमध्ये करोना फोफावतो आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी सर्वांनी लसीचे दोन्ही डोस घ्या अशी हात जोडून विनंती करतो असे सांगताना आता म्हणाल आता करोना गेला कशाला लस घ्यायची ? मात्र तसे नाही. करोनाच्या निमित्ताने आपल्याला आपल्या जिवनशैलित अमुलाग्र बदल करावे लागतील असे पवार म्हणाले. करोना पुन्हा फोफावल्यावर पुन्हा लॉकडाऊनचा कठोर निर्णय घ्यावा लागेल.

लग्नसराई सुरू झाली असून एकट्या महाराष्ट्रात २५ लाख विवाह होणार आहेत. विवाहात गर्दी होणार आहे. तेथे करोनाचा फैलाव होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. लॉकडाऊनचा निर्णय घेतल्यानंतर आर्थिक घडी बिघडते. विकासकामे ठप्प होतात. रोजीरोटीचा प्रश्‍न निर्माण होतो. त्यामुळे करोनाला गांभीर्याने घ्या असा सल्ला त्यांनी दिला. करोनामुळे काही लोकांची जगाला ओळख झाली. त्यात तुमच्या पारनेरच्या आमदाराचा समावेश आहे. मी दर शुक्रवारी पुण्यात आढावा बैठक घेत असे त्यावेळी अनेक नागरीक तुमच्या पारनेरच्या आमदारासाठी मदत म्हणून माझ्याकडे धनादेश आणून देत होते. नीलेशच्या रूपाने तुमच्या तालुक्याला एक चांगले नेतृत्व मिळाले आहे. कोव्हिड सेंटरमध्ये त्याने काळजी घेतली पाहिजे असे मला नेहमी वाटे. मात्र सामान्य प्रकृतीचा हा गडी रूग्णांमध्ये जाउन ऐटीत बसत होता. त्यांना जेवण खाऊ घालीत होता. या संकटात नीलेशने केलेेले काम राज्यातील २८८ आमदारांमध्ये एक नंबरचे होते. असा गौरव पवार यांनी केला.

आपल्या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांपासून वारकरी सांप्रदायाची परंपरा आहे. संतांची, भागवत धर्माची परंपरा पुढे नेण्याचे काम आपण सर्वजण करीत आहोत. निळोबारायांनी घालून दिलेल्या भक्तीमार्गातून चालत असताना त्यांच्या विचारांची महाराष्ट्राची संत परंपरा पुढे नेणाऱ्या भागवत धर्माचा, वारकरी सांप्रदायाचा वारसा वारकरी मंडळी चालवत आहेत. संत निळोबारांच्या गाथा हा सांस्कृतीक ठेवा आहे. पुढच्या पिढीसाठी तो मार्गदर्शक ठरेल. निळोबारांनी सर्वधर्मसमभावाचा विचार दिला. माणसाने कर्तव्य, जबाबदारी निष्ठेने पार पाडली पाहिजे ही शिकवण त्यांनी दिल्याचे पवार म्हणाले.

पारनेरच्या पाणी योजनेला मंजुरी

पारनेर शहराच्या पिण्याच्या पाणी योजनेचे सर्वेक्षण पुर्ण झाले असून त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी आमदार नीलेश लंके यांनी आपल्या भाषणात केली होती. त्याची दखल घेत मुळा धरणाच्या बॅक वॉटरमधून राबविण्यात येणाऱ्या या योजनेसाठी पाणी आरक्षीत करून निधी मंजुर करण्यात येत असल्याची घोषणा पवारांनी यावेळी केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात पाठवा, येत्या तीन महिन्यात या योजनेचे काम कसे सुरू होईल याची काळजी मी घेतो असेही पवार यांनी यावेळी सांगितले.


Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here