राज्यस्तरीय बालएकांकिका स्पर्धा ‘कांकरिया करंडक २०२१’ चे आयोजन

नगरमध्ये २५ व २६ डिसेंबर रोजी होणार स्पर्धा

अहमदनगर,दि.२७ नोव्हेंबर,(प्रतिनिधी) – अहमदनगर शहर हे महाराष्ट्रातील नाटय क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र आहे. त्याला एक गौरवशाली इतिहास आहे व अनेक राष्ट्रीय पातळीवरचे कलाकार या रंगभूमीने दिले आहेत. त्याच परंपरेला अनुसरून नगर येथील मराठवाडा मित्र मंडळ व मानकन्हैय्या ट्रस्ट यांनी मागील २३ वर्षांपासून राज्यस्तरीय बाल एकांकिका महोत्सव (स्पर्धा) स्व. कन्हैय्यालालजी कांकरिया स्मृती ‘कांकरिया करंडक’ आयोजित करत असून बालरंगभूमीसाठी समर्पित ही महाराष्ट्रातील एकमेव स्पर्धा आहे. या स्पर्धेत भाग घेण्यासाठी महाराष्ट्राबाहेरूनही संघ येत आहेत.

यंदाचे हे २४ वे वर्ष असून दि.२५ व २६ डिसेंबर शनिवार व रविवार नगर येथील माऊली संकुल येथे सकाळी ८ वाजल्यापासून दिवसभर या स्पर्धा होणार असून नाताळच्या सुट्टीत ही बालगोपाळांसाठी विशेष पर्वणी राहणार आहे असे अध्यक्ष डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सांगितले.

२५ व २६ डिसेंबर २०२१ या दोन दिवशी बालगोपाळाना सांस्कृतिक मेजवानी मिळत आहे. या दोन दिवसात अनेकविध नेपथ्य, प्रकाश योजना, संहिता, संवाद फेक, अभिनय, रंग व वेषभूषा पाहिल्यामुळे या विषयीचा चांगला अभ्यास या निमित्ताने होणार आहे. मनोरंजना बरोबरच कलाकाराची जडणघडण येथे होणार आहे. तरी जास्तीत जास्त बालमंडळींनी याचा आस्वाद घ्यावा. एकांकिका पाहण्यासाठी प्रवेश मोफत आहे याची नोंद सर्वांनी घ्यावी असे आवाहन ‘कांकरिया करंडक’ च्या स्वागताध्यक्षा डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. कांकरिया करंडक २०२१ चा परितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे अशी माहिती सचिव सदाशिव मोहिते यांनी दिली.

 ‘कांकरिया करंडक’च्या संयोजन समितीमध्ये स्पर्धा प्रमुख डॉ. वर्धमान कांकरिया तसेच डॉ. मुकुंद देवळालीकर, उमाकांत जांभळे, दत्ता इंगळे, चि. स्मिरा कांकरिया, सुभाष बागुल, मोईनुद्दिन इनामदार, सौदागर मोहिते, कु. प्रिया सोनटक्के, मिलिंद भोगाडे, मार्गदर्शक रमेशचंद्र छाजेड, किरण कांकरिया,रमेश बाफना, शशिकांत नजान यांचा समावेश आहे. तरी सर्व स्पर्धकांनी १० डिसेंबर २०२१ पर्यंत आपला प्रवेश फॉर्म भरून नांवनोंदणी करावी असे उमाकांत जांभळे यांनी आवाहन केले आहे. अधिक माहिती करिता मोहिते ९४२२०८३३३२, जांभळे ९८९०६७३२५१ यांच्याशी संपर्क साधावा.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here