अहमदनगर,दि.४ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे आज पुण्यात ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७३ वर्षांच्या होत्या. सिंधुताईचे रात्री ८ वाजून १० मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलेक्झी रुग्णालयामध्ये त्यांचे निधन झाले. महिनाभरापूर्वीचं सिंधुताईंवर हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने सिंधुताईंचे निधन झाले.
सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला होता. माई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधूताईचं जीवन अत्यंत खडतर होतं. बालविवाह झालेल्या सपकाळ यांनी नवऱ्याने केलेल्या अत्याचारांनंतर घर सोडलं. त्यानंतर अनाथांचा सांभाळ करणं हे त्यांनी आयुष्याचं ध्येय बनवलं. हजारो अनाथ मुला-मुलींना आश्रय देत त्यांची माय बनलेल्या सिंधुताई यांना नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. महिलांच्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याच्या आरंभीस केले.
सिंधुताई सपकाळ यांनी १९९४ साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी ‘ममता बाल सदन’ नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या ‘अनाथांची माय’ म्हणून परिचित झाल्या. सिंधुताई सपकाळ या गेली ४० वर्षे सामाजिक कार्य करत होत्या. त्यांना आजवर ७५० हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगायच्या की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.