‘पावनखिंड’ चा बॉक्स ऑफिसवर हाऊसफुल्ल धुमाकूळ

अहमदनगर,दि.२३ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कारकिर्दीतील अनेक शौर्यगाथा आपल्याला माहिती आहेत. अशाच एका शौर्यगाथेवर नुकताच प्रदर्शित झालेला मराठी चित्रपट म्हणजे ‘पावनखिंड’. हा पावनखिंडचा थरार प्रेक्षकांना पडद्यावर अनुभवायला मिळत आहे. अवघ्या चार दिवसात ‘पावनखिंड’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ माजवला आहे. पहिल्या तीन दिवसात या चित्रपटाने तुफान कमाई करत नवा इतिहास रचला आहे. 18 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवला आहे. या चित्रपटाला पहिल्या दिवशी तब्बल 1500 शो मिळाले होते. यासोबतच मराठी चित्रपटसृष्टीत कोणत्याही चित्रपटाला एका दिवसात इतके शो मिळणारा हा पहिला चित्रपट ठरला आहे.

‘पावनखिंड’ चित्रपटाने पहिल्या दिवशी 1.15 कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी 2 कोटींची आणि लगेच तिसऱ्या दिवशी 3 कोटींची कमाई करत मराठी चित्रपटांना सुगीचे दिवस दाखवले आहेत. या चित्रपटाच्या ओपनिंग आठवड्याची एकूण कमाई 6 कोटींच्या घरात पोहोचली आहे. अजूनही या कमाईचा आकडा वाढत चालला आहे. अशात ‘पावनखिंड’ हा चित्रपट आलिया भट्टच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटाला जबरदस्त टक्कर देणार असल्याचं सांगितलं जात आहे.

बहुचर्चित ‘पावनखिंड’ या चित्रपटाची प्रेक्षकांना बऱ्याच दिवसांपासून उत्सुकता होती. परंतु देशातील कोरोना परिस्थिती पाहता या चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये विलंब होत होता. गेल्यावर्षी म्हणजेच 10 जून 2021 ला हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाचा हाहाकार पाहून ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. त्यांनतर तब्बल सहा महिन्यांनंतर या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवी तारीख समोर आली होती.

अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर करत ‘पावनखिंड’ च्या प्रदर्शनची तारीख जाहीर केली होती. त्यानुसार 18 फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ‘पावनखिंड’ या चित्रपटाने मराठी मनोरंजनसृष्टीत एक आगळावेगळा विक्रम रचत सर्व चित्रपटगृहांच्या बाहेर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ चा बोर्ड लावल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here