कवी शब्दांच्या नात्याने समाज-मनाचे वेध घेतात – गीतकार सौदागर

कर्जत,दि.२२ फेब्रुवारी,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) – कवी कवितांच्या माध्यमातून समाज मनाचा वेध घेऊन ते शब्दबद्ध करीत असतो. त्या भावना शब्दाच्या पलीकडे नाते गुंफतात आणि रसिक मायबापाच्या मनावर अधिराज्य गाजवतात असे प्रतिपादन प्रसिद्ध गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी केले. ते कर्जत येथील प्रसिद्ध कवयित्री स्वाती पाटील यांच्या ‘उसवत्या सांजवेळी’या काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी आ.रोहित पवार, गायक आणि संगीतकार हर्षित अभिराज, कवी हनुमंत चांदगुडे, साहित्यिक प्रा.संदीप सांगळे, कवियत्री स्वाती पाटील यांच्यासह साहित्य, राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पाठयपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे म्हणाले की, ग्रामीण भागातील आम्हा कवींना समाजाचे प्रतिसाद मिळत आहे. याने आमच्या कवि मनाला मोठे समाधान मिळते आहे. अनेक ग्रामीण भागातील कवींना व्यासपीठ उपलब्ध होत आहे. यावेळी गायक आणि संगीतकार हर्षित अभिराज यांनी आपण लयबद्ध केलेल्या कविता आणि गझल सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी बोलताना आ.रोहित पवार म्हणाले की, आपण कुठल्याही कार्यक्रमात बोलू शकतो पण साहित्यिकांच्या कार्यक्रमात बोलण्याची मोठी अडचण होते. सर्व साहित्यिक हे शब्द आणि कविता या तोलामोलाची असते. मी एकदा अधिवेशनात कविता सादर करण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर परत मला कविता म्हणयाची इच्छा झाली नाही असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. राजकारणाच्या कार्यक्रमात आपण कितीही बोलू शकतो असे म्हणून कवयित्री स्वाती पाटील यांच्या काव्यसंग्रहाला शुभेच्छा दिल्या. यावेळी सूत्रसंचालन प्रा. विक्रम कांबळे यांनी केले तर आभार कवयित्री स्वाती पाटील यांनी मानले. 

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here