उड्डाणपूलाचे काम सुरू असताना सार्वजनिक वाहतूक बंद ठेवावी आरपीआयचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

अहमदनगर,दि.२३ मार्च,(प्रतिनिधी) – शहरातील उड्डाणपूलचे काम सुरू असताना अनेक अपघात घडत आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उड्डाणपूलाचे काम सुरू असताना सार्वजनिक वाहतूक बंद ठेवण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, मराठा आघाडीचे राज्य संघटक सिद्धार्थ सिसोदे, आय.टी. सेलचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, युवक जिल्हा सरचिटणीस दया गजभिये, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, नगर तालुका युवक सरचिटणीस निखिल सूर्यवंशी, मानस महासंघाचे अध्यक्ष विशाल अण्णा बेलपवार, ग्रामपंचायत सदस्य शैनेश्‍वर पवार, शिवम भिंगारदिवे, आकाश भिंगारदिवे, कुणाल माळवे, राहुल विघावे, विकी कांबळे आदी उपस्थित होते.

शहरातील उड्डाणपूल निर्मितीचे काम प्रगतिपथावर आहे. काम सुरु असताना अनेक लहान-मोठे अपघात घडत आहे. कधी पुलावरून सिमेंटचे ढेकळे पडतात, कधी स्लॅब बांधणीचा सांगाडा कोसळतो, तर कधी क्रेन तुटते असे अपघात सुरु असून, यामुळे एखाद्याचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. या पुलाचे काम लोकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
पूलाचे काम सुरु असताना कुठल्याही प्रकारे सुरक्षेचे नियोजन करण्यात आलेले नाही. हे काम दिवसा पूर्णपणे बंद ठेवून रात्रीचे काम चालू ठेवावे किंवा जेथे काम सुरु असेल त्या भागात वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात यावी किंवा प्रशासनाने वेगळे काहीतरी नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा निष्काळजीपणामुळे अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यास त्याला कंत्राटदार आणि वाहतूक पोलिस जबाबदार राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पूलाच्या कामाबाबत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनाने उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here