रोहित विकासकामासाठी झटणारा लोकप्रतिनिधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

कर्जत,दि.१३ नोव्हेंबर,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) – नगरपालिका आणि त्याचा आमदार एक विचाराचा हवा. जेणेकरून विकासाचे राजकारण करताना सोपे जाते. त्यामुळे आगामी काळात रोहितला साथ द्या असे म्हणत कर्जत नगरपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजवला. रोहित हा व्हिजन असणारा लोकप्रतिनिधी आहे. तो कर्जत एमआयडीसीसाठी फार प्रयत्न करतोय त्याला निश्चित यश मिळेल. तो विकासकामासाठी झटणारा आहे. त्यासाठी त्याला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. ते कर्जत येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना अशोक चव्हाण, राज्यमंत्री ना. दत्ता भरणे, ना.अब्दुल सत्तार, कर्जत-जामखेडचे आ.रोहित पवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, घनश्याम शेलार, बारामती ऍग्रोचे राजेंद्र पवार, काँग्रेसचे विनायक देशमुख, सुभाष गुळवे आदी उपस्थित होते.      

यावेळी पुढे बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पवार घराण्यात विकासाचे राजकारण केले जाते. त्यामुळे फक्त मतदारसंघात विकासकामे करून विरोधकांना उत्तर द्यायचे हे आमचे काम आहे. कोरोनानंतर सर्वच क्षेत्रात मोठी मंदी निर्माण झाली आहे. अशा काळात देखील रोहित याने मतदारसंघात छान काम केले आहे. अजून काही प्रलंबित कामे आहे तो करेन असा विश्वास आहे. 

तो काम करणारा लोकप्रतिनिधी आहे यात काडीमात्र शंका नाही. समाजकारण, राजकारण करताना तरुणांना संधी द्यायला हवी. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी राज्यसरकार कटीबद्ध आहे. विजेच्या टंचाईसाठी आपणच कारणीभूत आहोत. दिवसा लाईट का लावतात तेच समजत नाही. राज्यात ७० हजार कोटी महावितरणची थकबाकी आहे. त्यामुळे सर्वानी वेळेत वीजबिले भरली पाहिजे.

कोरोना, अतिवृष्टी, तोक्ते वादळ यामुळे सरकारला मर्यादा पडत आहे. मात्र तरी देखील महाविकास आघाडी उत्तम कारभार करीत आहे. आता करण्यात आलेली भूमिपूजन आणि त्याची कामे करताना सर्वानी त्याचा दर्जा उत्तम राखावा कारण हा पैसा सर्वसामान्य जनतेचा आहे. त्याचा जाब विचारण्याचा जनतेचा नैतिक अधिकार आहे. एसटी कर्मचारीच आपलीच माणसे आहेत. ६० वर्षे झाली एसटी महामंडळाला तेव्हा भाजपाला यांचा पुळका आला नाही. आज मात्र त्यांच्या संपाचे राजकारण करीत आहे. राज्य सरकार निश्चित यात लक्ष घालत आहे.  

यावेळी बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री ना अशोक चव्हाण म्हणाले की, आ रोहित पवार यांचे मतदारसंघातील लोकप्रियता पाहून त्यांच्या कामाची पावती दिसत आहे. १४५ कोटींची कामे आ पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर करून घेतली. पाठपुरावा कसा करावा ते आ रोहित पवार यांच्याकडून शिकण्यासारखी आहे. उपस्थित जनसमुदाय पाहून रोहित पवारांचे कार्य दिसते. पोटनिवडणुकीत भाजपला महाविकास आघाडीने दणका दिला. लगेच त्यांनी इंधनावरील दरकपात केली. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकीत भाजपाला असाच दणका द्या. मग पहा महागाई कशी कमी होते असे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली. 

राज्यमंत्री दत्ता भरणे म्हणाले की, सर्वाधिक निधी खेचून आणणारा लोकप्रतिनिधी म्हणून आ रोहित पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. त्या निधीतून त्यांनी कर्जत- जामखेड मतदारसंघाचा बदल घडवला आहे. त्यामुळे काही दिवसात बारामतीनंतर कर्जतचा नंबर निश्चित लागेल असा विश्वास आहे. रोहित पवार मंत्रालयात आल्यास कोणत्याच मंत्र्यांला सोडत नाही. पाठपुरावा करून निधी आणणे आणि व मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न सोडविणे त्यांना माहीत आहे.      

यावेळी ना अब्दुल सत्तार म्हणाले की, आमदार कसा असावा याचे उत्तम उदाहरण आ रोहित पवार आहेत. मंत्र्यांलयातील पहिल्या मजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यन्त कोणते काम कसे मंजूर करावे हे ते उत्तम जाणतात. सोबतीला अजितदादा असल्याने त्यांना विकासकामात काहीच कमी पडणार नाही. राम शिंदे मंत्री असताना एवढे कामे प्रलंबित कसे राहिले ते समजत नाही. त्यांनी कामे केली नाही म्हणून रोहित पवार यांना जास्त काम करावे लागत आहे. कोरोना काळात स्वताच्या मतदारसंघाबरोबर इतर मतदारसंघाला देखील बहुमोल सहकार्य केले. केंद्र सरकारात दोन विकणारे आणि आठ खरेदी करणारे आहेत असे म्हणत केंद्र सरकारवर टीका केली. पुरस्कार देताना मोदीजीनी जरा तपासून द्यावे असे म्हणत २०१४ साली खरे स्वातंत्र्य मिळाले या पद्मश्री अभिनेत्री कंगना राणावत यांच्या वाक्याचा खरपूस समाचार घेतला. आपण कर्जतमध्ये अजितदादा नसताना “पुन्हा येईन” असे म्हणत माजी मुख्यमंत्री फडणवीस यांची देखील खिल्ली उडवली.          

प्रास्ताविक करताना आ.रोहित पवार म्हणाले की, गट-तट न पाहता, जातीचे राजकारण न करता मतदारसंघाचा विकास करायचा हे ध्येय बाळगून दोन वर्षापासून विकासाचे राजकारण सुरू आहे. आपण आमदार असताना देखील मंत्रीमंडळातील सर्वांच्या सहकार्याने विकासकामे करीत आहोत. मात्र मागील आमदार विविध खात्याचे मंत्री असताना देखील ते काम करू शकले नाहीत असे म्हणत राम शिंदे यांना नाव न घेता टोला लगावला. महाविकास आघाडीत माझी हक्काची व्यक्ती म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा असल्याने ही कामे आपण करू शकलो. १३ वर्षानंतर या माजी आमदाराला स्वताचे जनसंपर्क कार्यालय उघडावे लागले ही या मतदारसंघाची शोकांतिका आहे. आगामी निवडणुकीत विकासाचे राजकारण म्हणून आमच्या मागे उभे राहावे असे आवाहन उपस्थिय जनसमुदायास केले. 

यावेळी काँग्रेसचे प्रवीण घुले, अड कैलाश शेवाळे, किरण पाटील, राष्ट्रवादीचे काकासाहेब तापकीर, सचिन घुले, विशाल मेहत्रे, राजेंद्र गुंड, शाम कानगुडे, बापूसाहेब नेटके, सुनील शेलार, अशोक जायभाय, नानासाहेब निकत, अमृत काळदाते, डॉ प्रकाश भंडारी, भास्कर भैलुमे, सभापती मनीषा जाधव, मनीषा सोनमाळी, डॉ शबनम इनामदार, उषा मेहत्रे, वृषाली पाटील, हर्षदा काळदाते आदी राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांचा प्रमुख वक्त्यांनी केला शब्दसुमनानी सन्मान     

मागील ४०० दिवसापासून कर्जतमधील सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कर्जत शहराचा माझी वसुंधरा आणि स्वच्छ अभियानात चेहरा-मोहरा बदलला आहे. या संघटनेच्या कार्याची सर्वच मंत्री महोदयांनी दखल घेत त्यांच्या सामाजिक कार्याचा गौरव आपल्या भाषणात केला. उपस्थित असलेले सर्व श्रमप्रेमी पिवळ्या टी शर्टमध्ये कार्यक्रमात उपस्थित होते. 


जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जतमध्ये काहींनी गमती केल्या. ते गमती करणारे आपलेच होते – उपमुख्यमंत्री अजित पवार     

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जतमध्ये पुरेसे संख्याबळ असताना महाविकास आघाडीच्या उमेदवार मिनाक्षी साळुंके यांना पराभव स्वीकारावा लागला. पराभवाला आपलीच माणसे कारणीभूत होते. राजकारणात आपण ते कधीच खपवून घेत नाही. अशा गमती बंद करा नाहीतर मला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा सज्जड दम पक्षात कुरघोडी करणाऱ्याना दिला. आगामी होणाऱ्या निवडणुकीत कोणी जर पक्षात राहून अशा गमती-जमती केल्यास त्याला झटका देवून घरी बसवू असे म्हणत पदाधिकाऱ्यांना सूचक इशारा देखील अजित पवार यांनी दिला. 


Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here