अहमदनगर,दि.५ नोव्हेंबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान केसचा तपास एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप होत होते. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी क्रुझवरील छापेमारी हा प्लान होता असा आरोप करण्यापासून ते वानखेडेंच्या राहणीमानापर्यंत विविध आरोप केले होते. वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावरही त्यांनी संशय व्यक्त केला होता. त्यामुळे वानखेडे वादात सापडले होते. त्यानंतर क्रुझ ड्रग्ज प्रकरणातील पंचानीही धक्कादायक कबुली दिली होती. तर काही पंचाना अटकही करण्यात आली होती. मुंबई एनसीबीकडून शाहरुख खानकडून २५ कोटींची मागणी केल्याचंही समोर आलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
अनेक आरोप झाल्यानंतर समीर वानखेडे यांची एनसीबीने खात्यांतर्गत चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी एसआयटीची स्थापनाही केली आहे. तसेच वानखेडेंच्या जात प्रमाणपत्राचा अहवाल अजून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने दिलेला नाही. आर्यन खान प्रकरणाची चौकशी आता संजय सिंग यांच्याकडे देण्यात आली आहे. उद्यापासूनच संजय सिंग या प्रकरणाची तपास करणार येणार असल्याचं सूत्रांनी सांगितले. मात्र, या सर्व गोष्टी अर्धवट असतानाच समीर वानखेडें यांच्याकडून एकूण सहा केसेसचा तपास काढून घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.