राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय – राज्यातील शाळा सोमवार पासून होणार सुरु

बालवाडी ते बारावीचे वर्ग सुरु होणार

अहमदनगर,दि.२० जानेवारी,(ऑनलाइन प्रतिनिधी) – राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेल्या शाळा सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे. स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते बारावी असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. तसेच निर्णयाचे अधिकार स्थानिक प्रशासनाकडे असतील असंही स्पष्ट केलं आहे. पालकांची समंती आवश्यक असून त्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं.

तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर ज्या ठिकाणी रुग्णसंख्या कमी असेल तिथे स्थानिक पातळीवर निर्णयाचे अधिकार द्यावेत असा मुद्दा मांडण्यात आला. त्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे तसा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावात येत्या सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा विचार करावा असं सांगण्यात आलं आहे. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, “२४ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. जिथे रुग्णसंख्या कमी असेल तिथे शाळा सुरू होतील. बालवाडी ते बारावीचे सर्व वर्ग सुरू होणार असून शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी आमची भूमिका आहे”.

“मुलांचं आरोग्य आणि मुलांची सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे स्थानिक स्थितीकडे लक्ष ठेवत वारंवार आढावा घेतला जावा आणि त्यानुसारच निर्णय घेतला जावा,” असं यावेळी वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. स्थानिक प्रशासनाने निर्णय घेताना तिथल्या परिस्थितीचा अंदाज घ्या असं सांगताना एक निर्णय घेतो म्हणून दुसऱ्याने घेतलाच पाहिजे असं नाही हे स्पष्ट केलं. शाळा किंवा महाविद्यालय सुरू करताना स्थानिक कोरोना परिस्थिती आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून स्थानिक प्राधिकरण निर्णय घेणार आहेत. त्याबाबत जिल्हाधिकारी किंवा पालिका आयुक्तांवर मुख्य जबाबदारी असेल.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here