शब्दगंधचे उपक्रम कौतुकास्पद – आमदार लहू कानडे

राहुरी,दि.२१ डिसेंबर,(प्रतिनिधी) – ‘शब्दगंध च्या वतीने राबविले जाणारे विविध साहित्यिक उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असुन गरजेचे आहेत असे मला लेखक व कवी म्हणून वाटते’ असे प्रतिपादन कविवर्य आ.लहू कानडे यांनी व्यक्त केले. शब्दगंध साहित्यिक परिषद, शाखा श्रीरामपूर व लोकरंग बहुउद्देशीय संस्था, वडाळा महादेवचे करिअर कॉम्प्युटरच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज पुण्यतिथी निमित्ताने आयोजित साहित्यिक मेळाव्यात ते बोलत होते. इच्छामनी मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास श्रीरामपूर पंचायत समितीच्या सभापती वंदना मुरकुटे,कॉ.बाबा आरगडे,कवयित्री शर्मिला गोसावी, खजिनदार भगवान राऊत,उपाध्यक्ष सुभाष सोनवणे,प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे,श्रीरामपूर शाखा अध्यक्ष मिराबक्ष शेख,शेवंगाव शाखा अध्यक्ष हरिभाऊ नजन आदी मान्यवर उपस्थित होते.       

पुढे बोलतांना आ.कानडे म्हणाले कि, गर्दी मध्ये प्रत्येकजण स्वतः ची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. यासर्व कोलाहलात भांडवली अर्थव्यवस्थेमुळे माणुस स्वतः ची ओळख विसरत चालला आहे. अशा परिस्थितीमध्ये शब्दगंधने आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच बरोबर अनेक नवोदित साहित्यिकांना स्वतःची ओळख निर्माण करून दिली आहे. राष्ट्र संत गाडगेबाबांना सर्व सामान्य गोरगरीब माणसांच्या दुःखांचे मूळ समजले होते. म्हणूनच त्यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थिती मध्ये ग्राम स्वच्छता व अंधश्रद्धा निर्मूलनाचे महान कार्य  केले.   

यावेळी वंदना मुरकुटे म्हणाल्या कि, साहित्य ही समाजाला सतत जागृत व जीवंत ठेवणारी गोष्ट आहे. शब्दगंध साहित्यिक परिषद ही समाजाचे संवर्धन करण्याचे काम करते. त्यामुळे राष्ट्र संत गाडगेबाबांच्याच्या जयंतीचे औचित्य साधुन आयोजित केलेला कार्यक्रम म्हणजे साहित्यिकांच्या सन्माना बरोबरच स्वच्छतेची शिकवण व आठवण करून देणारी घटना आहे. यावेळी कॉ.बाबा आरगडे, शर्मिला गोसावी, सुभाष सोनवणे, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रज्जाक शेख यांनी प्रास्ताविक केले. सुनीलकुमार धस यांनी सूत्रसंचालन केले तर रफिक बागवान यांनी आभार मानले.

या कार्यक्रमात मच्छिंद्र चोरमले, रंजना गवांदे, धोंडीरामसिह राजपुत, प्रा.अब्दुल कादिर,भाऊसाहेब उडानशिवे, डॉ.सलीम शेख, शाहीन शेख, नाना डोंगरे, देविदास बुधवंत, आयुब पठाण, अश्विनी धुमाळ यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाळासाहेब राऊत, अजय घोगरे, सुधाकर ससाणे, मुनीर सय्यद यांचा विशेष सत्कार करण्यात आला. दुसऱ्या सत्रात कवी सुभाष सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली काव्य संमेलन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मिराबक्ष शेख व आनंदा साळवे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास हेमचंद्र भवर, इंदुमती सोनवणे यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here