भाजपा ‘एकला चलो रे’ तर महाविकास आघाडीत जागावाटप आणि नगराध्यक्ष कळीचा मुद्दा
डॉ.अफरोजखान पठाण
कर्जत,दि.२७ नोव्हेंबर,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) – कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. माजीमंत्री राम शिंदे यांच्या कसोटीची तर आ.रोहित पवार यांच्या व्हिजनची लढाई यंदा पाहायला मिळणार. मात्र यात काँग्रेसची त्यात खासकरून घुले बंधूंची भूमिका महत्वपूर्ण राहणार आहे. सध्या तरी भाजपा एकला चलो रे तर आ.पवार महाविकास आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. मात्र यात मान-सन्मान महत्वाचा मुद्दा राहील यात काडीमात्र शंका नाही. शुक्रवारी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांची जिल्हा बँक संचालकपदी राष्ट्रवादीच्या कोट्यातून निवड आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या बॅकफूटचे कारण घडेल काय ? हे थोड्याच दिवसात समजेल.

कर्जत नगरपंचायतीमध्ये यंदा सर्वच प्रमुख पक्षांनी स्वबळाचा नारा दिला असला तरी राजकीय घडामोडी सुरू झाल्या आहेत. सध्या तरी माजी मंत्री राम शिंदे आणि खासदार सुजय विखे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाची एकला चलो रे ची भूमिका पुढे येत आहे. तर आमदार रोहित पवार राज्याच्या समिकरणानुसार महाविकास आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करीत आहे. भाजपाने केलेले विकासकामांचे मुद्दे पुढे करून त्यात महत्वाचा कर्जत शहराचा सोडवलेला पाणी प्रश्न यावर निवडणूक केंद्रीत करून जनतेसमोर जाण्याची व्युव्हरचना करीत आहे. तर महाविकास आघाडी राज्यात आपले सरकार असून शहरातील राहिलेले सामाजिक प्रश्न दर्जेदार आणि तातडीने सोडविण्यात येतील यावर लक्ष केंद्र करून पुढे येतील.

आमदार पवार आपल्या विकासकामांच्या यादीनुसार सर्वसामान्य जनतेला मतदानाचे आवाहन करतील यात शंका नाही. मात्र त्यांना त्यापूर्वी महाविकास आघाडी अभेद्य ठेवण्याची कसरत पार पाडावी लागणार आहे. शिवसेना मानसन्मानाच्या मुद्दयावर अगोदरच नाराज असून काँग्रेस जागावाटपात आपल्याला थोरला भाऊ या नात्याने संख्याबळ मागेल. यात महत्वाची भूमिका घुले बंधूंची राहील. घुले बंधूनी पैलवान चषक आणि कालच्या दिवाळी फराळ कार्यक्रमात आपले राजकीय वजन दोन्ही वजनदार राजकीय पदाधिकाऱ्यांना दाखवत आपल्याकडे लक्ष वेधले आहे. यासह यंदाच्या निवडणुकीत त्यांची भूमिका केंद्रबिंदू राखण्यात आजमितीस तरी यश मिळवले आहे.

मागील निवडणुकीत भाजप १२, काँग्रेस ४ आणि अपक्ष १ असे पक्षीय बलाबल होते. मात्र यंदा भाजपाचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याने भाजपास नवीन आणि जुने यांची सांगड घालत तुल्यबळ उमेदवार ठरवावे लागणार आहे. यात माजीमंत्री राम शिंदे आणि खासदार सुजय विखे यांना एकत्रित पवारांचा सामना करावा लागणार आहे. तर आमदार पवार यांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष असणारे शिवसेनाला सोबत घेत जागावाटपाचा तिढा सोडवत महाविकास आघाडी करून भाजपाशी चार हात करावे लागतील. १७ जागेत ते कोणाला कसा न्याय देतील हे पाहणे रंजक ठरणार आहे. हे करीत असताना त्यांना आपल्याच पक्षातील इच्छुक आणि भावी असणाऱ्यांना त्यागाची भूमिका द्यावी लागली तर ती नाराजी जिल्हा बँकेची पुनरावृत्ती करणारी ठरू नये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच झालेल्या सभेत कुरघोड्या करणाऱ्याना इशारा दिल्याने ते देखील सतर्कच राहतील.
काँगेसने निवडणुकीपूर्वीच युवक मेळावा घेत सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीमध्ये आपला स्वबळाचा नारा दिला होता. कर्जत शहरात घुले बंधूंचे वर्चस्व आहे. त्यांना मानणारा युवकवर्ग आणि त्यांच्यावर स्नेह ठेवणारा सर्वसामान्य माणसाचा मोठा गट त्यांच्या जमेची बाजू आहे. सध्या तरी त्यांची भूमिका समतोल राखण्याचा त्यांनी पुरेपूर केला असला तरी मागील दोन महिन्यात राम शिंदे आणि प्रवीण घुले यांची चार वेळा झालेली भेट वेगळे समीकरण तयार करीत आहे. त्यास दोन्ही नेत्यांनी दुजोरा दिला नसला तरी ऐनवेळी त्यांची मैत्रीपूर्ण लढत होण्याची दाट शक्यता राहील. मात्र काल पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार रोहित पवार यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांना जिल्हा बँकेत स्थान देत काँग्रेस सोबत राहिल असा इशारा दिल्याने आगामी काळात कर्जतच्या स्थानिक राजकारणात धुराळा उडणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.
महाविकास आघाडीत नगराध्यक्ष पद कळीचा मुद्दा राहणार
आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जागेचा तिढा सुटून महाविकास आघाडी झाली तरी पदाधिकारी निवड कळीचा मुद्दा राहणार आहे. मित्रपक्ष असणारे काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत कर्जत-जामखेड मतदारसंघ राष्ट्रवादीस सोडत त्याग केला होता. त्याची भरपाई स्थानिक निवडणुकीत काँग्रेस वरिष्ठ पद आपल्याकडे ठेवून करू शकते अशी प्रतिक्रिया एका काँग्रेसच्या पदाधिकार्याने नाव न छापण्याच्या अटीवर व्यक्त केली. तर जुनी राष्ट्रवादी आणि पक्षांतर करून सामील झालेले नवी राष्ट्रवादी कसा ताळमेळ ठेवून आपली जागा कायम राखतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
माजीमंत्री राम शिंदे आणि काँग्रेसचे प्रवीण घुले यांच्या चार भेटी योगायोग असू शकते?
राऊत यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रवेशानंतर माजीमंत्री राम शिंदे आणि काँग्रेसचे प्रवीण घुले यांच्या चार भेटी झाल्या. यात शिंदे आणि घुले यांचे मनोमिलन त्यांच्या छायाचित्रातील निखळ हास्याने नवीन समिकरणाची चाहूल देत आहेत. मागील एका तपात दोन्ही नेते कुठेही प्रत्यक्ष समोर आलेले नाहीत. मात्र मागील दोन महिन्यात चार भेटी सहज होणे योगायोग असू शकतो का ? असा सवाल देखील सर्वसामान्य माणसाच्या मनात उभा राहत आहे.