अजिंक्य गायकवाड मृत्यू प्रकरणात सहा जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर,दि.१३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – ‘मिस्टर इंडिया’चा किताब पटकवणारा अहमदनगरचा युवा शरीरसौष्ठवपटू अजिंक्य गायकवाड याच्या मृत्यू प्रकरणी महावितरणच्या अधिकाऱ्यांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरात असलेल्या टीव्ही केबलमध्ये वीज प्रवाह उतरल्याने शॉक बसून सप्टेंबर महिन्यात ३० वर्षीय अजिंक्यचा मृत्यू झाला होता. ग्रिलला चारही बोटं चिकटल्यामुळे तो ऑन द स्पॉट गेल्याचं वडिलांनी सांगितलं होतं.

महावितरण आणि केबल ऑपरेटरच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार झाल्याचा आरोप गायकवाड कुटुंबाने केला होता. जवळपास सव्वा महिन्यानंतर या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. टीव्ही केबल मालक, महावितरणचे वायरमन, ज्युनिअर इंजिनिअर, केबल पुरवठादार, टीव्ही केबल पुरवठादार अशा सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिंक्य गायकवाड वेगवेगळ्या खेळात निपुण होता. या बरोबरच २०१९ मध्ये त्याने दिल्ली येथे झालेल्या ‘मिस्टर इंडिया ग्लोबल’ स्पर्धेत सर्व फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ‘मिस्टर इंडिया’चा किताब पटकावला होता. त्याच्या मृत्यूमुळे गायकवाड परिवारासह अजिंक्यचे मित्र आणि चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. महावितरण आणि केबल चालकांच्या हलगर्जीपणामुळे अजिंक्यचा मृत्यू झाला असल्याचा दावा त्याच्या वडिलांनी केला आहे.

अहमदनगर शहरातील विनायक नगर परिसरात गायकवाड कुटुंबाच्या घरात ही घटना घडली. टीव्ही व्यवस्थित दिसत नसल्याने अजिंक्य केबल काढून परत जोडण्याचा प्रयत्न करत होता. यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसला आणि काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. सुरेश गायकवाड हे त्यांची पत्नी विजया, मुलगा अजिंक्य व सुन असे हॉलमध्ये गप्पा मारत टि.व्ही. पाहत बसले असताना खिडकीतून स्पार्किंगचा आवाज येत असल्याने अजिंक्य तिकडे पाहण्यासाठी गेला असता त्याचा हात खिडकीचे ग्रॅनाईटला लागला आणि त्याला इलेक्ट्रीक शॉक बसला. त्या वेळी घरातील सर्वजण हॉलमध्ये काय झाले हे पाहण्यास गेले असता अजिंक्यला इलेट्रीक शॉक बसल्याने तो बेशुद्ध अवस्थेत त्यांना दिसला.

त्याच्या मित्रांनी त्याला आनंदऋषी हॉस्पीटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी अजिंक्य हा मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी येवून घराची पाहणी केली. पाहणीत बाहेरील बाजुने टिव्ही केबल बांधलेली होती. या केबलची पाहणी केली असता टि.व्ही. केबल असलेल्या ठिकाणी ११ के.व्ही. लाईटचे तारांचे वरुन आलेली दिसली.

सदरची टि.व्ही. केबल ही ११ के.व्ही तारांचे वरुन आल्याने टि.व्ही. केबल तारांना घासुन त्यामधून इलेक्ट्रीक सप्लाय पास होवून अजिंक्य यास इलेक्ट्रीक शॉक बसलेला आहे हे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधुन त्याबाबत तपास केला, लोकल टि.व्ही. नेटवर्कची इनकमर केबलचे घर्षण महावितरण कंपनीच्या वीज वाहंकासोबत झाल्याने लोकल टि.व्ही. नेटवर्कच्या इनकमर केबलचे बाहेरील इन्सुलेशन आवरण निकामी होवुन आतील वाहकामध्ये विद्युत प्रवर्तन होवुन, लोकल टि.व्ही. नेटवर्कच्या केबलमध्ये लिकेटच करंट आल्याने सदर अपघात घडल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. दरम्यान या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी सुरेश गायकवाड यांच्या फिर्यादीवरून केबल चालक वनीता अनिल बोरा, पियुष अनिल बोरा ,महावितरण कंपनीचे सदर ठिकाणी खांबावरील विजवाहक उपारीतारावर चढविणारे संबंधित कर्मचारी, महावितरण कंपनीचे या ठिकाणी असणारे ज्यूनियर इंजिनियर, पियुष बोरा यांना केबल कनेक्शन पुरविणारे अहमदनगर, जिल्हयाचे पुरवठादार, टि.व्ही. केबल पुरवठादार कंपनी. या सहा जणांविरुध्द मृत्यूस कारणीभूत असल्याच्या गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here