यशस्वी हृदय शस्त्रक्रियेमुळे २ वर्षांच्या चिमुरडीला मिळाले नवजीवन

आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील सेवाभाव व डॉक्टरांच्या कौशल्याने पालकांच्या डोळ्यात तरळले आनंदाश्रु

अहमदनगर,दि.२८ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अवघ्या २ वर्षांच्या चिमुरडीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्याची अवघड कामगिरी तज्ज्ञ डॉक्टरांनी केली आहे. सर्वसाधारण परिस्थिती असलेल्या मातापित्याचे समुपदेशन करून हॉस्पिटलने महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत ही शस्त्रक्रिया पूर्ण मोफत केली. लहानगीच्या उपचारासाठी अनेक ठिकाणी खेटे मारुन थकलेल्या चिमुरडीचे पालकांच्या चेहर्यावर शस्त्रक्रियेनंतर मुलगी पुन्हा बागडू लागल्याने आनंदाश्रु तरळले.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील चिमुकल्या इशान्वीला दि. १६ सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १८ सप्टेंबर रोजी तिची ह्रदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली  व २२ सप्टेंबरला तिला घरी देखील सोडण्यात आले.

सदर मुलगी दीड वर्षांची झाली तरी तिच्या शरीराची पूर्ण वाढ होत नव्हती. ही बाब पालकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवले व चाचण्या केल्या. परंतु काही फरक दिसत नव्हता. तिच्या शरीरात अशुद्ध रक्त मिसळले गेले होते. त्याचा परिणाम झाला की तिचे शरीर जसे वाढावे तसे वाढत नव्हते. वजन देखील कमी झाले होते. वारंवार संक्रमण होऊन श्वसन करताना त्रास होत होता. पालकांनी  जवळपासच्या खाजगी डॉक्टरांशी व हॉस्पिटलशी संपर्क करून काही उपचार करता येतात का पाहिले. पण प्रतिसाद दिसत नव्हता. या दरम्यान डॉक्टरांच्या निदर्शनास आले की बाळाच्या हृदयात १६ मि. मि.छिद्र आहे. (ASD) Atrial septal defect.  शक्य तितक्या लवकर ऑपरेशन करा असे त्यांनी सुचवले.

पालकांनी जवळपासच्या हॉस्पिटलशी संपर्क करून चौकशी केली. त्यांना ही शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान ३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे आणि हे ऑपरेशन केवळ महानगरातच केले जाऊ शकते, असं सांगितलं गेले. ही शस्त्रक्रिया वैद्यकीय क्षेत्रात खूप अवघड  मानली जाते. ज्यामध्ये हृदयाला फुफ्फुसांच्या मशीनवर ठेवले जाते आणि शस्त्रक्रिया केली जाते. ही सर्व शस्त्रक्रिया करण्यासाठी किमान अडीच तास वेळ लागतो. हे सर्व ऐकून पालकांची अधिक चितात वाढली. त्यांच्यासाठी प्रचंड रक्कम जमा करणे कठीण होते.या दरम्यान त्यांना माहिती मिळाली की हे ऑपरेशन अहमदनगरच्या आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मध्ये केले जाऊ शकते. जास्त वेळ न घालवता त्यांनी हॉस्पिटल व्यवस्थापनाशी संपर्क करून सदर शस्त्रक्रियेची माहिती घेतली. डॉक्टरांनी त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला.  सदर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत करण्यात येईल. ती सुंपर्णपणे मोफत असेल. तुम्ही निश्चिंत होऊन बाळाला रुग्णालयात दाखल करू शकता. ही सर्व माहिती घेऊन पालकांनी रुग्णाला (बाळाला) दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

त्यानंतर बाळावर इंट्राकार्डियाक रिपेअर ऑफ आट्रीयल सेप्टल डिफेक्ट (ओपन हार्ट सर्जरी) ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेच्या अगोदर पालकांच्या मनात खूप भीती होती.  हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने त्यांना विश्वास दिला. डॉ. प्रभात कुमार (बाल हृदयरोगतज्ज्ञ, डीईसीओ), डॉ. संदीप तडस (कार्डियाक सर्जन), डॉ. राहुल एरंडे (भूल तज्ञ), डॉ. विनय छल्लानी (भूल तज्ञ), डॉ. वसंत कटारिया (फिजीशियन) यांनी आपलं संपूर्ण वैद्यकीय कौशल्य व अनुभव पणाला लावून शस्त्रक्रिया यशस्वी केली. रुग्णाला 2-3 दिवस आयसीयू (अतिदक्षता विभागात) मध्ये ठेवण्यात आले. अशा रुग्णांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त ही काळजी घेण्यात आली. त्यामुळे अत्यंत कमी काळात रुग्ण संपूर्णपणे बरा होऊन त्याला डिस्चार्ज देण्यात आला.

यशस्वी शस्त्रक्रियेमुळे सदर मुलगी सर्वसामान्य इतर मुला- मुलीं सारखी जगू शकेल. या आजारामुळे तिला भविष्यात  त्रास होणार नाही. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी रित्या केल्याचे समजताच पालकांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु होते. त्यांनी डॉक्टर व हॉस्पिटल प्रती कृतज्ञता व्यक्त केली.उपचारादरम्यान उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल, अचूक मार्गदर्शन आणि रुग्णाची  अतिशय आस्थेने काळजी घेतल्याबद्दल हॉस्पिटल व्यवस्थापनाचे पालकांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here