दशकपुर्ती साहित्यसंमेलन काव्यसंमेलनाध्यक्षपदी शब्दगंधचे सुनील गोसावी यांची निवड

राहुरी,दि.६ सप्टेंबर,(प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, नाशिक जिल्हयाचे वतीने दरवर्षी जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात वेगवेगळ्या ठिकाणी राज्यभरातील नवोदित व ग्रामीण साहित्यिकाना हक्काचे व्यासपीठ देणारे साहित्य संमेलन आयोजित केले जाते. यंदा या साहित्य संमेलनाचे दशकपुर्ती (१० वे) वर्ष आहे. या संमेलनात होणाऱ्या काव्यसंमेलनाध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक,कवी सुनील गोसावी यांची निवड करण्यात आली अशी माहिती परिषदेचे नाशिक जिल्हाध्यक्ष तथा आयोजक नवनाथ अर्जुन पा.गायकर यांनी दिली.        

या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी उत्तर महाराष्ट्र प्रमुख आनंदा अहिरे यांची निवड करण्यात आली आहे, तर काव्यसंमेलनाध्यक्षपदी अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक, कवी सुनील गोसावी यांची निवड करण्यात आली आहे. सुनील गोसावी हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव असुन ते दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, देवळालीप्रवरा नगरपरिषद येथे सहा.प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने आत्तापर्यंत चौदा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचे आयोजन त्यांनी केलेले आहे. त्यांनी वन्स मोअर मराठी कविता, वेदनेचा हुंकार, शब्द रंग, शब्द गुंफण, अनोखा, सर्वस्पर्शी, शब्द सावल्या, प्रेरणा सूर्य इत्यादी पुस्तकांचे संपादन केले आहे.

त्यांनी राज्य व जिल्हास्तरीय साहित्य संमेलनामध्ये काव्यवाचन केलेले असून आकाशवाणी अहमदनगर वर ६ वेळा कवितावाचन तर आकाशवाणी पुणे करिता कार्यक्रम व कविता वाचन केलेले आहे. त्यांना केंद्र सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने त्यांना जिल्हा युवा पुरस्कार मिळालेला असून इतर विविध चौदा पुरस्कार मिळालेले आहेत. शब्दगंध प्रकाशन, अहमदनगरच्या माध्यमातून त्यांनी नवोदितांची २५० पुस्तके प्रकाशित केली आहेत.       

१८ ऑक्टोबर २०२१ रोजी होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या काव्यसंमेलनाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शब्दगंध चे अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत, लोकसंस्कृती विकास संशोधन व संवर्धन संस्थाचे प्रा.डॉ.मिलिंद कसबे, वाचकपीठ चे प्राचार्य चंद्रकांत भोसले, माणिकराव गोडसे, आनंदा अहिरे, बाळासाहेब गिरी यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here