एकरकमी एफआरपी मिळावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी मैदानात – खा. राजू शेट्टी

राहुरी,दि.१३ ऑक्टोबर,(प्रतिनिधी) – राज्यातील बहुतेक ऊस उत्पादकांच्या म्हणण्यानुसार साखर कारखान्यांनी बळजबरीने व दबाव आणून ऊसाचे करार करून घेतले असल्याचे सांगितले आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांशी सविस्तर बोलणे झाले असून सदर ऊस उत्पादकांचे म्हणणे ऐकून घेवून असे करार रद्द करत अशा ऊस उत्पादकांना एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भातील मागणीला आयुक्तांनी अनूकुलता दर्शविली आहे. अशा ऊस उत्पादकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना गप्प बसणार नसल्याचे संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. 

गेल्या दोन दिवसापासून ते जिल्हा दौऱ्यावर आहेत. राहुरीहून अकोलेकडे जाताना तालुक्यातील चिंचोली येथे ते थांबले असता स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. ‘एकरकमी एफआरपी मिळालाच पाहिजे’ च्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. प्रसंगी ते ‘नगर संचार’चे प्रतिनिधी बाळकृष्ण भोसले यांच्याशी संवाद साधला. त्यांचेसमवेत जिल्हाध्यक्ष रविभाऊ मोरे उपस्थित होते. प्रसंगी चिंचोली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ व ऊसाची मोळी देवून सन्मानित करण्यात आला. 

पुढे बोलताना शेट्टी म्हणाले केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकार ऊसप्रश्नी चालताना दिसते आहे. मुळात जास्त खर्च असणाऱ्या ऊसासारख्या पिकाचे चुकारे कारखाने करार करुन तीन टप्प्यात देत आहेत. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होवून देशोधडीला लागला आहे. तर कारखानदार श्रीमंत होत चालले आहे. एकरकमी एफआरपी मिळावा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रमुख मागणी आहे. शेतकऱ्यांचे बळजबरीने करार करुन घेऊन त्यांना तुकड्या – तुकड्यात एफआरपी देणे हा त्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय आहे. त्याचप्रमाणे थकीत एफआरपी वर १५ टक्के व्याज देवून ऊस उत्पादकांना न्याय द्यावा तसेच एफआरपी न देणाऱ्या कारखान्यावर कायद्याप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करणे अपेक्षित असताना केवळ राजकीय दबावापोटी अशा कारवाया होत नाहीत.

भविष्यात अशा जिल्हाधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी भाग पाडणार असल्याचेही राजू शेट्टी म्हणाले. प्रसंगी सरपंच गणेश हारदे, जालिंदर काळे, संजय राका, बाळासाहेब लाटे, गणेश लाटे, स्वाभिमानीचे महेश नलगे, सुनील लाटे, किशोर गायकवाड, अकील शेख, विलास लाटे, मच्छिंद्र नलगे, सर्जेराव लाटे, रायभान नलगे, अनुप भोसले, गुलाब भोसले, अमोल भोसले, सचिन कातोरे, सुधाकर पठारे, भाऊसाहेब ब्राम्हणे, राजु राका आदिंसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here