शिकारीसाठी आलेला बिबट्या शेतकऱ्याने गोठ्यात कोंडला

राहुरी,दि.८ जानेवारी,(प्रतिनिधी) – तालुक्यातील ताहाराबाद येथील कारभारी कोंडाजी औटी यांच्या जनावरांच्या गोठ्यात  काल, गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्या शिरला. कारभारी औटी यांनी धाडस करत त्याला गोठ्यात कोंडले. गोठ्याचा दरवाजा त्यांनी बंद केल्याने पुढे बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यासाठीची मोहीम यशस्वी झाली. वनविभागाने त्या ठिकाणी तात्काळ पिंजरा लावला व मध्यरात्री दोनच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला.

राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात काही महिन्यापासून बिबट्याचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. मागील महिन्यात वनविभागात कार्यरत असलेले ताहराबाद येथील लक्ष्मण किनकर हे बिबट्याच्या हल्ल्यात मयत झाले. तालुक्यातील ताहाराबाद येथील कारभारी औटी यांच्या जनावरांच्या गोठ्यात दि. ६ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास एक बिबट्या गायांच्या गोठ्यात शिरला. यावेळी परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. या गोठ्यात दोन गाई होत्या.

एका गाईवर त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र गाईने त्याला प्रतिकार केल्याने बिबट्या घाबरला व जवळच गोठ्यातच असलेल्या कोंबड्याच्या खुराड्यात त्याने स्वतः आसरा घेतला. बिबट्या खुराड्यात शिरताच कोंबड्या खुराड्या बाहेर पडल्या. गायीच्या प्रतिकारामुळे घाबरलेल्या बिबट्याने कोंबड्यावर हल्ला केला नसावा. कारभारी औटी यांनी तात्काळ गोठ्याचा दरवाजा बंद करून घेतला. वनविभागाला माहिती मिळताच राहुरीचे वनपरीक्षेत्र अधिकारी गायकवाड हे आपल्या ताफा घेऊन घटनास्थळी पोहोचले, तसेच माणिकडोह बिबटा निवारा केंद्र येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांना देखील पाचारण करण्यात आले. तत्काळ पिंजरा लावला गेला. रात्री उशीरा दोन वाजता बिबट्या जेरबंद करण्यात यश आले.

ताहाराबाद परिसरात आणखी काही बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. सध्या बिबट्याचा ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वावर वाढला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण तयार पसरले आहे. याकामी सर्पमित्र कृष्ण पोपळघट, चांगदेव किंकर, मुनीर देशमुख, गुलाब शेख, किरण उदावंत, नारायण झावरे, सुखदेव औटी, बाळासाहेब औटी आदींनी सहकार्य केले. बिबट्याची मादी सहा ते सात वर्षाची असून तिला माणिकडोह येथील बिबट्या निवारा केद्रात आज नेण्यात आले. बिबट्या पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here