त्या कृत्याबाबत आमदाराने मागितली जाहीर माफी

अहमदनगर,दि.१४ ऑक्टोबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – अवघा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानतो. शिवाजी महाराजांबद्दल सर्वांच्याच मनात आदर, प्रेम आणि अभिमानाची भावना आहे. मात्र, छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अश्वावर उभं राहून हार घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजू नवघरे यांच्यावर टीका होऊ लागली. मात्र, आपल्याकडून चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर राजू नवघरे यांनी जाहीर माफी देखील मागितली आहे. माफी मागताना राजू नवघरे यांना आपले अश्रू अनावर झाले.

हा प्रकार घडला हिंगोलीच्या वसमत शहरात. राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. मात्र, असं करताना राजू नवघरे यांनी अश्वावर उभं राहून महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण केला. विशेष म्हणजे, यावेळी शिवसेनेचे माजी आमदार आणि सहकारमंत्री जयप्रकाश मुंदडा हे देखील उपस्थित असल्याचं सांगितलं आहे. हा व्हिडीओ लागलीच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

वसमत शहरात शिवाजी महाराज यांचा पंचधातूने बनवण्यात आलेला १४ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारला जामार आहे. ९ ऑक्टोबर रोजी जयपूरवरुन हा पुतळा वसमतच्या दिशेनं रवाना झाला होता. आज दुपारी औंढा नागनाथ शहरात आगमन होताच नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुतळ्याचं स्वागत केलं. त्यानंतर शिवरायांचा पुतळा वसमत शहरात दाखल झाला. त्यावेळी आमदार राजू नवघरे यांनी घोड्यावर चढून शिवरायांना पुष्पहार अर्पण केला. मात्र, नवघरे यांच्या या कृतीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय. संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटना आणि शिवप्रेमींनी या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलाय.

दरम्यान, “छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा मी कार्यकर्ता आहे. माझ्यासोबत तिथे सगळे आले आणि मला वर चढवलं. माझी चूक असेल, तर मी माफी मागतो. पण विनाकारण माझी बदनामी करण्याचा प्रयत्न करू नका. मी एकटाच चढलो असं दाखवलं जात आहे. मी एकट्यानंच पाप केलं असेल तर मी त्यासाठी फाशीला जायला तयार आहे. पण माझी काहीही चूक नसताना आमदार झाल्यापासून मला त्रास देण्याचं काम केलं जात आहे”, असं राजू नवघरे यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here