राज्य सरकारने केली घोषणा, १५ फेब्रुवारी पर्यंत सर्व महाविद्यालय राहणार बंद

अहमदनगर,दि.५ जानेवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे. मंगळवारी यासंदर्भात सविस्त बैठक झाल्यानंतर आज उदय सामंत यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. “सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, विद्यापीठांशी संलग्नित महाविद्यालयांमधली परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विजेची अनुपलब्धता, नेटवर्क कनेक्टिव्हिटीमुळे, विद्यार्थ्यांच्या कुटुंबात किंवा विद्यार्थी करोनाबाधित असतील तर त्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, याची दक्षता सर्व विद्यापीठांनी घेतली पाहिजे. खासगी विद्यापीठांनी देखील याच निर्णयाचं पालन करायला हवं”, असं ते म्हणाले.

मुंबईत दिवसागणिक रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत काल तब्बल १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालयं देखील बंद करण्याबाबतची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर आज उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

उदय सामंत यांनी खालील प्रमाणे निर्णय जाहीर केले.
– राज्यातील अकृषी विद्यापीठे, अभिमत, स्वयं अर्थसहाय्यीत विद्यापीठे, तंत्रनिकेतन, शैक्षणिक संस्था १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार.
– दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार.
– परीक्षा ही ऑनलाईन होणार.
– काही कारणास्त्व विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी द्यावी.
– प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश.
– वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय.
– परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात काळजी घेऊन राहता येणार.
– महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना.
– विद्यार्थ्यांसोबत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना.
– ५० टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार
– हे सगळे नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here