प्रबोधनकार क्रीडा प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद – माजीमंत्री राम शिंदे

कर्जत तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान संपन्न

कर्जत,दि १६ जानेवारी,(नगरसंचार वेब प्रतिनिधी) – विकासाच्या गप्पा मारणाऱ्यानी  मतदारसंघाचा काय विकास केला ? ते त्यांनी एकदा जनतेला सांगावेच. फक्त फसविणे या लोकांना छान जमते मात्र ही कर्जत-जामखेडची जनता आहे. ते खुर्चीवर बसवतात पण आणि वेळ आल्यावर खाली सुद्धा खेचतात. प्रबोधनकार क्रीडा प्रतिष्ठान कायम सामाजिक उपक्रम राबवत असून त्याचे कार्य कौतुकास्पद आहे. आज त्यांनी सुपे ग्रामस्थांना ब्लॅंकेट वाटप करून त्यांना मायेची उब दिली असे प्रतिपादन माजीमंत्री राम शिंदे यांनी केले.

ते सुपे (ता.कर्जत) प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक सेवाभावी ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने माजी मंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचे निम्मित ग्रामस्थांना ब्लँकेट वाटप प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी मंत्री राम शिंदे यांच्यावतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधत पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, प्रबोधनकार क्रीडा प्रतिष्ठानचे सचिन पोटरे, दिलीप भालसिंग, पक्ष निरीक्षक बाळासाहेब महाडीक, मातोश्री पदमाताई पोटरे, सुपेच्या सरपंच अश्विनी नांगरे आदी उपस्थित होते.      

यावेळी पुढे बोलताना राम शिंदे म्हणाले की, मंत्रीपदाच्या काळात जनतेने जे-जे मागितले ते प्रामाणिकपणे पूर्ण केले. २२ गावासाठी तुकाई चारी मंजूर केली. काम प्रगतीपथावर सुरू होते मात्र सव्वा दोन वर्षात काय झाले ? हा प्रश्न विद्यमान लोकप्रतिनिधीना लाभार्थ्यांनी विचारावे. शासकीय अधिकाऱ्यांना माणसे गोळा करण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी करीत आहे. कर्जत- जामखेडच्या काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी राम शिंदेंची साथ सोडली मात्र समोर बसलेली जनता आज देखील राम शिंदे बरोबर असल्याची प्रचिती उपस्थित जनसमुदाय पाहून होत असल्याने मन भरून येते. कर्जत नगरपंचायतीमध्ये भाजपाची माणसे फोडण्याचे काम विद्यमान लोकप्रतिनिधीने केले. विकास केला असेल तर त्यांनी लोकशाही पद्धतीने निवडणूक लढण्याचे काम केले असते. केवळ समोर त्यांना पराभव दिसत होता आपली सत्ता कशीच येणार नाही त्यामुळे माणसे फोडली. उमेदवारांवर दबाव आणला. त्यांना अर्ज माघार घेण्यात लावला असा आरोप माजीमंत्री शिंदे यांनी आ पवार यांच्यावर केला.          

यावेळी बोलताना सचिन पोटरे म्हणाले की, प्रबोधनकार क्रीडा प्रतिष्ठानच्यावतीने सामाजिक कार्यात पाऊल ठेवले आहे. वीरमाता पुरस्कार, रक्तदान शिबीर सारखे सामाजिक उपक्रम राबवत आलो आहे. पत्रकार दिनानिम्मित पत्रकारांचा सन्मान करण्याचे भाग्य मिळत असल्याचे पोटरे यांनी आपले मनोगतात व्यक्त केले. 
           

याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे,  बाळासाहेब महाडीक, दिलीप भालसिंग आदींची भाषणे झाली. पत्रकारांच्यावतीने निलेश दिवटे, आशिष बोरा, दादा शिंदे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच काका धांडे, किसान मोर्चाचे सुनील यादव, अरविंद नांगरे, पप्पूशेठ धोदाड, नंदलाल काळदाते, ज्ञानदेव लष्कर, दिग्विजय देशमुख, प्रसिद्धी प्रमुख गणेश पालवे, संभाजी गोसावी आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल निंबोरे यांनी केले. 

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here