आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार

अहमदनगर,दि.१ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – देशात सध्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब आणि उत्तराखंडसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. तसेच गेल्या दोन वर्षांपासून देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात मांडण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पात सरकारचे प्राधान्यक्रम काय असतील आणि त्यात नोकरदार आणि सर्वसामान्यांना काय मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत आणि नंतर राज्यसभेत आर्थिक पाहणी अहवाल (२०२१-२२) सादर केला. यावेळी कोरोना संकटामुळे दोलायमान झालेली देशाची अर्थव्यवस्था कोरोनापूर्व पातळीवर आली असून, ती आगामी आर्थिक वर्षांतील (२०२२-२३) संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याइतकी मजबूत होऊ लागली आहे, त्यामुळे नव्या आर्थिक वर्षांत राष्ट्रीय सकल उत्पादनाचा वेग म्हणजे विकासदर ८ ते ८.५ टक्के राहू शकेल, असा आशावादी सूर यंदाच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये उमटला. दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्यासाठी निर्मला सीतारामन संसदेत दाखल झाल्या आहेत. कोरोनाचा फटका बसलेल्या अर्थव्यस्थेला या अर्थसंकल्पामुळे गती मिळेल तसंच सर्वसामान्य करदात्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

आज सकाळी ११ वाजता लोकसभेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वित्त मंत्रालयाच्या महासंचालकांनी दिलेल्या (मीडिया आणि कम्युनिकेशन्स) माहितीनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाला अर्थसंकल्पाची थोडक्यात माहिती देतील आणि त्यानंतर संसदेकडे रवाना होतील.

प्रस्थापित परंपरेनुसार, भारताच्या राष्ट्रपतींना सर्वप्रथम केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती दिली जाते. केंद्रीय अर्थसंकल्पात राष्ट्रपती कोणतेही बदल सुचवत नसल्यामुळे ही बैठक नेहमीचीच असते. परंतु संसदेत अधिकृतपणे अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांना राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते. राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षेत मंत्रिमंडळाला संक्षिप्त स्वरुपात अर्थसंकल्पाबाबत माहिती देतात. अर्थ मंत्रालयाकडून अर्थसंकल्पाबाबत गोपनियता पाळली जाते. अर्थमंत्र्यांनी आपले भाषण सादर करण्यापूर्वी अर्थसंकल्पातील तरतुदींबाबत गुप्तता राखणं बंधनकारक असतं.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here