पत्रकार चौकात भीषण अपघातात दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू

अहमदनगर,दि.२९ मार्च,(प्रतिनिधी) – शहरातील पत्रकार चौकात दुचाकी आणि ट्रकच्या अपघातात दोन सख्खे चुलत भाऊ जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. उद्धव सुभाष तेलोरे आणि बाळकृष्ण श्रीकांत तेलोरे (रा. कोल्हूबाईचे कोल्हार, ता. नगर) अशी अपघातात ठार झालेल्या चुलत भावांची नांवे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, उद्धव आणि बाळकृष्ण दुचाकीवरून (एमएच १६ बी ई ४९५५) मनमाड रस्त्यावरून तारकपूर रस्त्याकडे जात होते. ट्रकही त्याच रस्त्याने जात होता. परंतु, तेलोरे बंधूंनी त्यांची दुचाकी पत्रकार चौकातील एल अ‍ॅण्ड टी कंपनीने विकसित केलेल्या बागेतून भरधाव नेली. बागेतून रस्त्यावर येत असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणार्‍या ट्रकची (एमएच १६ सीसी ५७५९) जोराची धडक बसली. त्यामुळे तेलोरे बंधूंचा वाहनावरील ताबा सुटून ते रस्त्यावर खाली पडले. या दरम्यान, ट्रक चालकाला वाहनावर नियंत्रण मिळवेपर्यंत दोघेही ट्रकखाली चिरडले गेले. अपघात घडताच बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. पोलिसांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. परंतु, दोघेही जागेवरच गतप्राण झाले होते.

बाळकृष्ण याने अहमदनगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिक्षण पूर्ण केले होते. पुणे येथे एका खासगी कंपनीत काही काळ काम केले. कोरोना काळात गावी राहण्यास आला होता. उद्धवचे पाथर्डी येथे एस. वाय. बी. ए. या वर्गामध्ये शिक्षण सुरू होते. तो लष्करात भरती होण्यासाठी सराव करत होता. लष्करात भरतीला जाण्यासाठी रेल्वेचे तिकिट काढण्यासाठी दोघे हिरो होंडा पॅशन या दुचाकीवरून अहमदनगरला आले होते.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here