अहमदनगर,दि.२१ जानेवारी,(ऑनलाइन प्रतिनिधी) – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत चौथे स्थान पटकावले आहे. इंडिया टुडे (India Today)च्या मूड ऑफ द नेशनने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या यादीत ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन तिसऱ्या तर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन पाचव्या स्थानी आहेत.
दरम्यान आजच पंतप्रधान मोदी लोकप्रिय नेत्यांच्या यादीत प्रथम क्रमांकावर असल्याचा रिपोर्ट आला आहे. आता मुख्यमंत्री ठाकरेही याबाबतीत मागे राहिले नाहीत. त्यांनीही लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत चौथे स्थान मिळवले आहे. दरम्यान जागतिक स्तरावरील अॅप्रूव्हल रेटिंग या सर्वेक्षणामध्ये नरेंद्र मोदींनीही पहिले स्थान पटकावले आहे. अमेरिकतील ग्लोबल लीडर अॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केले आहे. यात मोदी ७१ टक्क्यांनी प्रथम स्थानावर आहेत. त्यामुळे सर्वाधिक लोकमान्यता असणारे नेते म्हणून नरेंद्र मोदी प्रथम स्थानावर आहेत.
नरेंद्र मोदींनी या यादीत १३ नेत्यांना मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.