अहमदनगर,दि.२६ डिसेंबर,(ऑनलाईन प्रतिनिधी) – कलर्स मराठी वाहिनी वरील प्रसिध्द रिऍलिटी शो ‘बिग बॉस मराठी ३’चा विजेता विशाल निकम ठरला आहे. बिग बॉसची ट्रॉफी आणि २० लाखांचं बक्षीस मिळवत त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमामध्ये त्याने मुख्य भूमिका साकारली होती. त्याच्यासोबत अमृता धोंगडे ही अभिनेत्री होती. त्यानंतर विशालनं धुमस या मराठी सिनेमातही काम केलं. विशालने ‘सात जलमाच्या गाठी’ ‘दक्खनचा राजा जोतिबा’, ‘जय भवानी जय शिवाजी’ या सारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. १०० दिवसांच्या या खेळात मनोरंजन विश्वातील १५ कलाकारांनी सहभाग घेतला होता.
‘बिग बॉस मराठी ३’चा आज ग्रँड फिनाले पार पडला आहे. टॉप ५ स्पर्धकांमध्ये विशाल निकम, मीनल शाह, विकास पाटील, उत्कर्ष शिंदे आणि जय दुधाणे यांनी स्थान मिळवलं आहे. यात उपविजेता जय दुधाने ठरला आहे. दरम्यान बिग बॉसने विशाल निकम आणि जय दुधाणे यांना शेवटचा आदेश दिला. या दोन्ही स्पर्धकांनी घरातील दिवे विझवून बाहेर येण्याचा आदेश दिला. रंगमंचावर येऊन या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी विशाल निकम याची बिग बॉस पर्व ३ चा विजेता म्हणून घोषणा केली. बिग बॉस मराठी ३’च्या मंचावर महेश मांजरेकर यांनी त्यांच्या आगामी नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटात ते चक्क जय दुधाणे याला मुख्य भूमिका देणार असल्याचे घोषित केले आहे. ‘शनिवार वाडा’ असे या चित्रपटाचे नाव असणार आहे.